पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून उपनिरीक्षकाची हत्या, टार्गेट किलिंगची वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 08:38 AM2022-06-18T08:38:09+5:302022-06-18T08:38:44+5:30
Kashmir Killings : पोलीस उपनिरीक्षक फारुख अहमद मीर हे आयआरपीच्या 23 व्या बटालियनमध्ये होते आणि सध्या ते सीटीसी लेठीपोरा येथे तैनात होते.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एक हत्या केली आहे. येथील पुलवामामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांच्यावर गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फारुख अहमद मीर यांचे दहशतवाद्यांनी त्यांच्या घरातून अपहरण करून जवळच्या शेतात नेऊन गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. दोन ते तीन दहशतवाद्यांनी हे हत्याकांड घडवून आणले. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक फारुख अहमद मीर हे आयआरपीच्या 23 व्या बटालियनमध्ये होते आणि सध्या ते सीटीसी लेठीपोरा येथे तैनात होते.
दरम्यान, या घटनेमागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे सध्या समजू शकलेले नाही. ही घटना रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्यामुळे पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची चिंता वाढली आहे. कारण, गेल्या एका महिन्यात दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे अनेक नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे टार्गेट किलिंगच्या घटना थांबल्या होत्या. मात्र आता एका पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येनंतर पोलीस आणि लष्करासमोरील आव्हान आणखी वाढले आहे.