९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 09:22 AM2024-06-12T09:22:32+5:302024-06-12T09:24:08+5:30
Jammu Kashmir Riasi Attack : ९ तारखेला वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
Terror Attack in Reasi : ९ जून रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४१ जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्यानंतर एक गोळी चालकाला लागली, ज्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले अन् गाडी थेट दरीत कोसळली. पण, गाडी दरीत कोसळल्यामुळे अनेकांचा जीव वाचला. बस दरीत कोसळली नसली तर इतर सर्व लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असत्या, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. या घटनेवर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिने देखील शोक व्यक्त करताना मृतांना श्रद्धांजली वाहिली. रितीकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत म्हटले की, हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका २ वर्षाच्या मुलाचा देखील समावेश होता. अचानक झालेल्या गोळीबारामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात पडली. या अपघाताची माहिती पीडितांनी दिली.
Ritika Sajdeh's Instagram story for Hindu pilgrims. pic.twitter.com/eWsjcN69HG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 11, 2024
रितिकाने तिच्या पोस्टमध्ये आणखी म्हटले की, एका व्यक्तीने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, टेकड्यांवरून गोळ्या झाडल्यानंतर मी आणि माझी दोन मुले बसच्या सीटखाली लपलो. त्या २०-२५ मिनिटांची दहशत मी कधीही विसरू शकत नाही. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जेव्हा गोळीबार झाला तेव्हा आम्ही न हलता जमिनीवर पडून राहिलो. हल्लेखोर तेथून निघून जाईपर्यंत आम्ही मृत झाल्याचे भासवले.