Jammu-Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, सामान्य नागरिकांच्या हत्येप्रकरणी 570 संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 02:08 PM2021-10-10T14:08:37+5:302021-10-10T14:08:43+5:30
अधिकृत आकडेवारीनुसार, 2021 मध्ये आतापर्यंत 28 नागरिकांना दहशतवाद्यांनी ठार केलं आहे.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये समाजविरोधी घटकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. काश्मीर खोऱ्यात एका आठवड्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा दलांनी सुमारे 70 जणांना श्रीनगरमधून ताब्यात घेतलं आहे. तसेच, संपूर्ण काश्मीरमध्ये एकूण 570 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनेक दगडफेक करणाऱ्यांना आणि इतर समाजकंटकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचे समन्वय साधण्यासाठी केंद्राने गुप्तचर विभागाचे एक उच्च अधिकारी श्रीनगरला पाठवले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने(NIA) दहशतवादी कारवायांविरोधातील रणनीतीचा भाग म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये 16 ठिकाणी छापेमारी केली आहे.
गेल्या पाच दिवसात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांपैकी चार अल्पसंख्यांक समाजातील आणि घाटीतील मुख्य शहरी केंद्र असलेल्या श्रीनगरमधील होते. श्रीनगरमधील सरकारी शाळेत गुरुवारी एका महिला मुख्याध्यापिका आणि शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याशिवाय, काश्मिरी पंडित आणि श्रीनगरच्या सर्वात प्रसिद्ध फार्मसीचे मालक माखनलाल बिंदू यांचीही मंगळवारी त्यांच्या दुकानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
ठार झालेल्या सहा नागरिकांपैकी चार अल्पसंख्याक
चाट विक्रेते बिहारमधील वीरेंद्र पासवान आणि मोहम्मद शफी लोन यांचाही मंगळवारी श्रीनगर आणि बांदीपोरा येथे मृत्यू झाला. अधिकृत आकडेवारीनुसार 2021 मध्ये दहशतवाद्यांनी आतापर्यंत एकूण 28 नागरिकांचा बळी घेतला आहे. 28 ठार झालेल्यांपैकी पाच स्थानिक हिंदू किंवा शीख समुदायाचे होते आणि दोन गैर-स्थानिक हिंदू मजूर होते.