Jammu Kashmir: राजौरीमध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; तर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे पाठवले हत्यार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 03:39 PM2021-08-06T15:39:09+5:302021-08-06T15:39:35+5:30
Jammu Kashmir: काल श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात दहशतवाद्यांनी एकानंतर एक असे दोन मोठे स्फोट घडवून आणले.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या राजौरी जवळील थानामंडी परिसरात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अजूनही या भागात चकमक सुरुच आहे. दरम्यान, सांबा जिल्ह्यातील राजपुरा सेक्टरमध्ये सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळला आहे. यात, 2 पिस्तुल, 5 मॅगझीन, 122 राउंड गोळ्या आणि एक सायलेंसर आढळलेत. हे शस्त्र पाकिस्तानी ड्रोनमधून भारतात आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याला काल दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात एकानंतर एक असे दोन मोठे स्फोट घडवून आणले. पहिला ब्लास्ट दिवसा डाउनटाउन परिसरात झाला तर दुसरा ब्लास्ट सायंकाळी बेमिना परिसरातील एसएसबी चौकात झाला. यानंतर पोलिस आणि सैन्य अलर्ट झाले असून, ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.
3 महीन्यांपूर्वी ड्रोन हत्यार भारतात आणले
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरुच आहेत. दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये हत्यार पाठवण्यासाठी आता ड्रोनचा वापर करत आहेत. 14 मे रोजी सांबा जिल्ह्यातील सीमेजवळ ड्रोनमधून हत्यार आणण्यात आले होते. त्यात एक AK-47, एक 9एमएम पिस्तुल, एक मॅगझीन आणि 15 काडतुस होते. सुदैवाने हे हत्यार बीएसएफच्या जवानांनी जप्त केले.