Jammu Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी सलीम पर्रेसह दोन ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 05:17 PM2022-01-03T17:17:53+5:302022-01-03T17:18:34+5:30
ठार झालेला सलीम पर्रे लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या होता. त्याच्यावर काश्मीरमधील नागरिकांच्या हत्या आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्याचा आरोप होता.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या पर्रेसह इतर एक दहशतवादी ठार झाला आहे. काश्मीरमधील नागरिकांच्या हत्या आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यात सलीमचा हात होता. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, सलीम पर्रे मूळ पाकिस्तानचा रहिवासी होता. या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा शोध अनेक दिवसांपासून सुरू होता. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात अजूनही चकमक सुरू आहे.
अरनिया सेक्टरमध्ये घुसखोर ठार
सीमा सुरक्षा दलाने (BSF) जम्मू विभागातील अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. एका घुसखोराला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानकडून घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न होता. तत्पूर्वी, काश्मीर विभागातील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, त्याला लष्कराच्या जवानांनी ठार केले.
मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू सेक्टरमधून शस्त्रास्त्रांची एक खेप जप्त केली आहे. सोमवारी सकाळी सैनिक गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना ही पिशवी झुडपात लपवून ठेवलेली दिसली. झडती घेतली असता त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सीमा चौकी 35 जवळ सापडलेल्या बॅगमधून दारूगोळा आणि प्रतिबंधित औषधेही सापडली आहेत.