Jammu Kashmir: फारुख अब्दुल्लांसह 'या' चार माजी मुख्यमंत्र्यांना धक्का, सुरक्षेत होणार कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 18:29 IST2022-01-06T18:28:52+5:302022-01-06T18:29:04+5:30
जम्मू-काश्मीरमधील चार माजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो.

Jammu Kashmir: फारुख अब्दुल्लांसह 'या' चार माजी मुख्यमंत्र्यांना धक्का, सुरक्षेत होणार कपात
श्रीनगर :जम्मू-काश्मीरच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत कपात होण्याची चिन्हे आहेत. केंद्राने माजी मुख्यमंत्र्यांना स्पेशल सर्व्हिस ग्रुप (SSG) सुरक्षा पुरवली होती. पण, आता ही सुरक्षा काढून टाकली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना एसएसजी कव्हर मिळाले आहे. या नेत्यांसाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने 2000 साली ही सुरक्षा व्यवस्था तयार केली होती.
नव्या सुरक्षा व्यवस्थेत कोणाला मिळेल जबाबदारी?
सुरक्षा आढावा समन्वय समितीने नेत्यांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा ग्रुप जम्मू-काश्मीरमधील व्हीव्हीआयपी नेत्यांची सुरक्षा पाहतो. आतापर्यंत राबविण्यात आलेल्या यंत्रणेत डीआयजी, एसएसपी दर्जाचे अधिकारी या व्हीव्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेत गुंतले होते. पण, आता बदलेल्या व्यवस्थेत डीएसपी दर्जाचे अधिकारी त्यांना संरक्षण देतील.
निकालावर अजूनही विचार सुरू
दरम्यान, या नेत्यांची सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या या निर्णयाचे पुनरावलोकन केले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की एसएसजीमध्ये कपात केल्याने एलिट युनिटच्या तयारीला अडथळा येऊ शकतो.
फारुख आणि आझाद यांना झेड प्लस सुरक्षा
गुलाम नबी आझाद वगळता इतर सर्व माजी मुख्यमंत्री श्रीनगरमध्ये राहतात. फारुख अब्दुल्ला आणि आझाद यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) सुरक्षा कायम राहणार आहे. या दोन्ही नेत्यांना सरकारकडून झेड प्लस सुरक्षा दीर्घकाळापासून मिळालेली आहे.