Video - काश्मीरमधील तरुणांना लष्करात जायचंय; 111 जागांसाठी तब्बल 2500 अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:33 AM2019-02-20T11:33:40+5:302019-02-20T11:43:12+5:30
बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरू केली आहे. 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हजारो तरुण लष्करात जाण्यास उत्सुक आहेत. बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरू केली आहे. 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
लष्करातील भरतीला काश्मिरी तरुणांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. 'लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. आम्हाला नोकरीची फार कमी संधी आहे. लष्करात भरती होऊन आम्ही आमच्या कुटुंबाची सुरक्षा करू शकतो सोबत काळजीदेखील घेऊ शकतो' असं भरतीसाठी आलेल्या बिलाल अहमद या तरुणाने म्हटले आहे. तर 'आम्ही काश्मीरच्या बाहेर जाऊ शकत नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. काश्मीरमधील जवानांना संवेदनशील परिसरांमध्ये तैनात केलं तर ते स्थानिकांशी चर्चा करत जास्त चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात' असं ही एका तरुणाने सांगितलं आहे.
#WATCH Queues seen at an Army recruitment drive for 111 vacancies in Baramulla earlier today. #JammuAndKashmirpic.twitter.com/BJFbHmBcaL
— ANI (@ANI) February 19, 2019
गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे.
#PulwamaTerrorAttacks काश्मिरात घुसखोरी करणारे जिवंत राहणार नाहीत; भारतीय लष्कराचा दहशतवाद्यांना इशारा https://t.co/WQ481lyeqo@narendramodi#PulwamaEncounter #PulwamaAttack
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 19, 2019
भारतीय लष्कराची 'मातृशक्ती'ला साद; 'अतिरेकी मार्गावरील मुलांना घरी परत बोलवा!' https://t.co/5ViyxxBwis#PulwamaEncounter #PulwamaAttack
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 19, 2019
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारीलाच गुप्तचर संस्थांकडून पुलवामा IED हल्ल्या होण्यासंदर्भात अॅलर्ट जारी केला होता. यासाठी योग्य ती सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले होते. परिसराची योग्य रितीने तपासणी केल्याशिवाय जवानांचा ताफा पुढील मार्गाच्या दिशेने जाऊ देऊ नका, अशी स्पष्ट सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती. पण, दुर्दैवानं या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या पत्रकात 9 फेब्रुवारीचा दिवस सर्वांधिक धोकादायक असल्याचाही इशारा देण्यात आला होता. विशेषतः पहाटेच्या सुमारास हल्ला होईल, अशी सूचना जारी करण्यात आली होती. पण बर्फवृष्टी आणि दुरुस्तीच्या कामांमुळे गेले चार दिवस हा राजमार्ग बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, हा मार्ग सुरू झाल्यावर नेहमीच्या तुलनेत जास्त वाहने आणि जवान पाठविण्यात आले. मार्ग मोकळा केल्यानंतर 14 फेब्रुवारीला सीआरपीएफचे जवान 70हून अधिक वाहनांमधून पुलवामा येथे जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने प्रवास करताना दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.