आधार कार्ड पाहिले अन् गोळ्या घातल्या; काश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंचे टार्गेट किलिंग, 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 02:03 PM2023-01-02T14:03:03+5:302023-01-02T14:04:40+5:30
आज एका IED स्फोटात लहान मुलगी ठार झाली, तर काल दहशतवाद्यांनी चौघांची हत्या केली.
श्रीनगर: जम्मूच्या राजौरी येथील डांगरी गावात सोमवारी सकाळी मोठा IED स्फोट झाला. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला असून, 5 जण जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी ज्या तीन घरांमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्यापैकी एका घरात हा स्फोट झाला. कालच या ठिकाणी दहशतवाद्यांनी 4 हिंदूंची टार्गेट किलिंग केली होती, तर 7 जणांना जखमी केले आहे.
एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. एनआयएचे पथकही येथे तपास करणार आहे. तपासादरम्यान एक IED सापडला असून, तो डिफ्यूज करण्यात आला आहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरुच आहे. रविवारी संध्याकाळी गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी घरात IED ठेवला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आधार कार्ड पाहून हिंदूंना ठार केलं
डांगरी येथे हिंदूंच्या हत्येविरोधात निदर्शने करण्यात येत होती, ती निदर्शने संपल्यानंतर काही वेळातच एका घरात स्फोट झाला. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. लोकांनी सांगितले की रविवारी संध्याकाळी दहशतवादी आले होते, आणि त्यांनी लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले. त्यांनी सर्वांचे आधार कार्ड पाहिले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात प्रीतम शर्मा, आशीष कुमार, दीपक कुमार आणि शीतल कुमार यांचा मृत्यू झाला.
श्रीनगरमध्ये CRPF बंकरवर ग्रेनेड हल्ला
श्रीनगरमधील हवाल चौकात रविवारी संध्याकाळी 6 वाजता दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात जवानांना कोणतीही इजा झाली नाही, मात्र समीर अहमद मल्ला हा नागरिक जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जवानाकडून रायफल हिसकावण्यात आली
रविवारी सकाळी 12:45 वाजता दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात सीआरपीएफ जवानाकडून एके-47 रायफल हिसकावण्यात आली. रायफल हिसकावणाऱ्या तरुणाचे नाव इरफान बशीर गनी(वय 25) आहे. सायंकाळपर्यंत रायफल हिसकावणाऱ्या तरुणाला त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात नेऊन शस्त्र परत केले. यापूर्वी दहशतवाद्यांनी 183 बटालियनच्या जवानाकडून एके-47 रायफल हिसकावून घेतली होती.