"देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान, पण..."; शहीद थापाच्या आई-बाबांची डोळे पाणावणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:09 AM2024-07-17T10:09:51+5:302024-07-17T10:14:00+5:30
डोडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. या चकमकीत दार्जिलिंगचे रहिवासी असलेले कॅप्टन ब्रृजेश थापा हे देखील शहीद झाले.
जम्मूच्या डोडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. या चकमकीत दार्जिलिंगचे रहिवासी असलेले कॅप्टन ब्रृजेश थापा हे देखील शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढणाऱ्या टीमचं नेतृत्व कॅप्टन थापा करत होते. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून आई-बाबांना धक्का बसला आहे. पण आपल्या मुलाने देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कॅप्टन ब्रृजेश थापा यांची आई नीलिमा थापर यांनी सांगितलं की, "तो मार्चमध्ये घरी आला होता. तीन-चार दिवस राहून तो निघून गेला. जुलैमध्ये येतो असे सांगून तो पुन्हा गेला. तो तिथे खूप आनंदी होता. तो माझ्याशी आणि त्याच्या वडिलांशी रविवारीच बोलला. सकाळी ९ वाजता त्याचा फोन आला. त्यानंतर त्याच्याशी बोललो नाही. काल त्यांच्या निधनाची बातमी मिळाली."
"आपल्या मुलाच्या जाण्यामुळे खूप दु:ख आहे पण तो देशासाठी शहीद झाला याचा अभिमान आहे. माझा मुलगा असला म्हणून काय झालं, शेवटी कुणाला तरी सीमेवर जावं लागेल. कोणी नाही गेलं तर आपण सर्व सुरक्षित कसे राहणार? सैन्यात भरती होऊन वडिलांप्रमाणे नाव कमावण्याचं त्याचं स्वप्न होतं."
बृजेश थापा हे २६ वर्षांचे होते. २०१९ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यात दाखल झाले. कॅप्टन थापा यांच्या तीन पिढ्यांनी सैन्यात सेवा बजावली आहे. त्यांचे वडील भुवनेश थापा कर्नल राहिले आहेत. भुवनेश थापा सांगतात की, मुलगा ब्रृजेशचं लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं. मी सुरुवातीला त्याला नौदलात भरती होण्यास सांगितलं होतं... आर्मीचं काम अवघड आहे, पण त्याला फक्त आर्मीच जॉईन करायचं होतं. बी.टेक करूनही त्याने लष्कराची निवड केली.
भुवनेश थापा सांगतात की, मी सैन्यात कर्नल होतो, जेव्हा मी गाडीच्या पुढे बसायचो आणि इतर सैनिक मागे असायचे, तेव्हा मला पाहून तो म्हणायचा की एक दिवस मीही यांच्यासारखा होईन आणि पुढेच बसेन. त्याने देशासाठी बलिदान दिलं याचा मला अभिमान आहे, पण आता आम्ही त्याला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही याचं दुःख आहे.