मोदी, शाह, राजनाथ...1 तास चालली CCS ची बैठक, दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 03:58 PM2024-07-18T15:58:54+5:302024-07-18T15:59:37+5:30
जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक झाली.
Jammu-Kashmir Terror Attack : राजधानी दिल्लीत आज कॅबिनेट सुरक्षा व्यवहार समिती, म्हणजेच CCS ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एक तास चाललेल्या या बैठकीत जम्मूमधील वाढत्या दहशतवादी हल्ले आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवादी सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या विविध भागात दहशतवादी हल्ले वाढले असून, यामध्ये अनेक जवानही शहीद झाले आहेत. आता सरकार या दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर खोऱ्यातील हल्ल्यांपैकी डोडाचे प्रकरण ताजे आहे. येथे सोमवारी(दि. 26) सायंकाळी झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले होते.
आजही सकाळी(दि.18) जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील कास्तीगड भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, डोडामधील कास्तीगड भागात अजूनही चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचा एक जवानही जखमी झाला आहे. दरम्यान, डोडा येथे महिनाभरात दहशतवाद्यांशी चकमक होण्याची ही सहावी घटना आहे.
डोडा चकमकीत पाच जवान शहीद
सोमवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह 5 जवानांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डोडा शहरापासून 55 किमी अंतरावर असलेल्या जंगलात मोहिम सुरू होती. यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला, सैन्याच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर सैनिकांनीही घनदाट जंगलातून त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास जंगलात आणखी एक चकमक झाली. या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले, ज्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. शहीद झालेल्या जवानांमध्ये लष्कराचा एक अधिकारी, तीन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा समावेश आहे.
काश्मीर टायगर्सने घेतली जबाबदारी
काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने डोडा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना जैश-ए-मोहम्मदची शाखा आहे. याच संघटनेनं कठुआ येथील लष्करी ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.