Jammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 07:56 AM2018-05-28T07:56:50+5:302018-05-28T09:23:31+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आर्मी कॅम्पवर भ्याड हल्ला केला आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आर्मी कॅम्पवर भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय जवानांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत आहेत. कुलगाममध्येही आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि आता पुलवामातील काकपोरा येथेही दहशतवाद्यांनी जवानांना टार्गेट केलं. हल्ल्यात एक जवान व एक स्थानिक जखमी झाले होते. या दोघांनाही तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला.
#UPDATE Exchange of fire between terrorists and Army at an army camp in Pulwama's Kakpora: One Army jawan who got injured in the firing, succumbed to his injuries. Firing still underway. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) May 27, 2018
दरम्यान, शुक्रवारीदेखील जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका कॅम्पवर दहशतवाद्यांनी दुपारी ग्रेनेड फेकून हल्ला केला. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ३४ राष्ट्रीय रायफलच्या नेहामा कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. लष्करप्रमुख जनरल बिपिनकुमार काश्मीरच्या पेहलगाममध्ये असतानाच हा हल्ला झाला होता. जनरल रावत यांनी शुक्रवारी पाकिस्तानला इशारा दिला की, काश्मीर खो-यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेनजीकच्या नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केले जात आहे.
पोलिसांसह पाच जण जखमी
जम्मूमध्ये बीसी रोडवरील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह पाच जखमी झालेत. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने कठुआमधील शाळा बंद ठेवल्या आहेत. परिसरातील एक लाखांवर रहिवाशांनी भीतीने घरे सोडून पळ काढला आहे. यावर्षी झालेल्या गोळीबारात ३९ नागरिक मृत्युमुखी पडले आणि १८ जवान शहीद झाले आहेत.
अतिरेक्यांकडून एकाची हत्या
काश्मीर खो-यातील बांदीपोरा जिल्ह्यात गुरुवारी रात्री लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी एका रहिवाशाची गळा चिरून हत्या केली. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात पोलिसांना मोहम्मद याकूब याचा मृतदेह आढळून आला. लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक अतिरेकी सलीम पररे याचा या हत्येमागे हात असल्याचा दावा पोलीस करत आहेत. हत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.