दहशतवादी येतात, डोक्यावर बंदूक ठेवून मागतात अन्न-पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:54 AM2024-07-12T10:54:37+5:302024-07-12T10:54:47+5:30
काही गावकरी संधी मिळताच सुरक्षा दलांना देतात माहिती; शोधमोहीम सुरूच
सुरेश डुग्गर
जम्मू : दहशतवादी हिरानगर, मछेडी, रियासी, राजौरी आणि पूंछ भागात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असून, ते येथील लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून राहण्यासाठी घर आणि जेवण मिळवत असल्याचे तपासात समोर आले आहे. हिरानगरच्या सैदा सोहल गावात गेल्या महिन्यात मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांनीही आधी गावातील काही घरांमध्ये जबरदस्तीने आश्रय घेतला आणि जेवण व पाणी मागितले. गावकऱ्यांनी वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा केला, मात्र, मछेडी येथे दहशतवाद्यांनी हल्ला केलाच.
प्राप्त माहितीनुसार, सदोता गावातील एका वृद्ध महिलेने सुमारे १८ तरुण दहशतवाद्यांसाठी जेवण बनवले होते. हल्ल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या सुमारे २४ जणांची चौकशी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यांनी ३ ते ४ गट केले असून, ते नंतर वेगवेगळ्या भागात गेले आहेत. येथे दहशतवाद्यांनी इतर अनेक घरांमधून जेवण आणि पाणी गोळा करण्याचा प्रयत्न केला, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केल्याने यात त्यांना यश आले नाही.
अमरनाथ यात्रा सुरळीत
दहशतवादी हल्ल्यांमुळे अमरनाथ यात्रेकरुंमध्ये भीतीची छाया आहे. यावेळी यात्रेतील ८० टक्के सहभागी असे आहेत जे पहिल्यांदाच यात्रेत सहभागी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या धमक्या आणि बदलत असलेले हवामान यातूनही अमरनाथ यात्रा यंदा सुरळीतपणे सुरू आहे. २९ जूनपासून सुरू झालेली ही यात्रा १९ ऑगस्ट रोजी अमरनाथ गुहेच्या आत बांधलेल्या शिवलिंगाचे मुख्य दर्शन घेऊन संपेल.
जंगलात दहशतवाद्यांचा शोध
लष्कराच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कठुआ-उधमपूर-डोडा परिसरातील घनदाट जंगलात सुरू असलेली शोधमोहीम गुरुवारी चौथ्या दिवसात वाढविण्यात आली असून, येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत.
सोमवारी झालेल्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी ६० जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा संशय आहे.
हल्ल्यामागे २३ दहशतवादी
मछेडीमध्ये हल्ला करणारा २३ दहशतवाद्यांचा गट इतके दिवस कुठे आश्रय घेत होता, याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत.
या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी घुसखाेरी करुन भारतात शिरले आहेत.