Jammu Kashmir: आई-वडिलांचा आवाज ऐकताच दहशतवाद्यांनी केलं आत्मसमर्पण; पहा चकमकीचा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:07 PM2022-07-06T17:07:39+5:302022-07-06T17:08:25+5:30
दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू असतानाही सुरक्षा दलांनी संयम बाळगला आणि त्यांच्यावर गोळीबार केला नाही. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना चकमक स्थळी आणले आणि त्यांनीच मुलांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले.
Lashkar Militants Surrender:जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या चकमकीदरम्यान, दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विशेष म्हणजे, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी त्यांच्या पालकांची मदत घेतली आहे. आई-वडिलांचा आवाज ऐकताच दहशतवाद्यांनी हत्यारे खाली ठेवली. ते अलीकडेच लष्कर फ्रंट-टीआरएफ गटात सामील झाले होते.
कुलगामचे एसएसपी डॉ. संदीप चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगामच्या हदिगाम गावात अज्ञात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता भारतीय लष्कर आणि जेकेपीने या भागात संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. बुधवारी पहाटे अडीच वाजता संशयित घरांची झडती घेत असताना चकमक झाली.
पहा व्हिडिओ-
#WATCH कुलगाम: एक माता-पिता ने आतंकी बने अपने बेटे से हथियार छोड़ आत्मसमर्पण करने का अनुरोध किया।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 6, 2022
कुलगाम के हादिगाम इलाके में सुबह एक मुठभेड़ शुरू हुई जहां दो आतंकवादियों ने माता-पिता और पुलिस की अपील पर आत्मसमर्पण कर दिया। आपत्तिजनक सामग्री, हथियार और गोला-बारूद बरामद हुआ। pic.twitter.com/6kkt3sQLdf
या चकमकीत नव्याने भरती झालेले दोन स्थानिक तरुणही होते. नदीम अब्बास भट आणि कफील मीर अशी त्यांची नावे आहेत. दोघेही अलीकडेच दहशतवादी गटात भरती झाले होते. या माहितीनंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू असतानाही सुरक्षा दलांनी संयम बाळगला आणि त्यांच्यावर गोळीबार केला नाही. दोन्ही दहशतवाद्यांना घराच्या एका भागात कोंडून ठेवण्यात आले. यावेळी दोन्ही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना चकमक स्थळी आणले. त्यांनी आपल्या मुलांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले.
पालकांच्या प्रयत्नाने जीव वाचला
अखेर सकाळपर्यंत पालक आणि सुरक्षा दलांकडून आत्मसमर्पण करण्याचे वारंवार केलेले आवाहन कामी आले आणि सकाळी दोन्ही दहशतवाद्यांनी शस्त्रे टाकून आत्मसमर्पण केले. या दोघांना नंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्यांच्याकडून काही शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना कायदेशीर औपचारिकता आणि सुरक्षा तपासणी पूर्ण केल्यानंतर संबंधित कुटुंबांच्या ताब्यात देण्यात येईल.