जम्मू काश्मीर - लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने केलं ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 10:01 AM2017-11-21T10:01:52+5:302017-11-21T10:02:46+5:30
जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे चकमकीदरम्यान लष्कर जवानांनी दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे चकमकीदरम्यान लष्कर जवानांनी दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी एसपी वैद्य यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं आहे की, 'उत्तर काश्मीरमध्ये हंदवाडा जिल्ह्यातील मगम परिसरात सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. जबरदस्त कामगिरी'.
Three LeT terrorists all Pakistanis neutralized in Magam area of Handwara district in North Kashmir. Excellent work!: tweets J&K DGP SP Vaid (File Pic) pic.twitter.com/yp2L2xIhpN
— ANI (@ANI) November 21, 2017
याआधी शनिवारी 18 नोव्हेंबरला उत्तर काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी एका चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार केलं होतं. विशेष म्हणजे कंठस्नान घालण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा पुतण्या आणि ‘जमात’चा दुसऱ्या क्रमांकाचा नेता अब्दुल रहमान मक्कीचा मुलगा ओवैदचाही समावेश होता. ओवैदचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. ओवैद आणि त्याचे साथीदार लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. ओवैद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीऊर रहमान लख्वी याचा देखील भाचा होता. ओवैदचा खात्मा हा लष्कर- ए- तोयबासाठी मोठा हादरा मानले जात आहे.
पोलीस अधिका-याने माहिती दिली होती की, दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी हाजिन परिसरातील चंगरगीर गावात परिसरला वेढा घातला आणि शोधमोहिम सुरु केली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला होती, ज्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. यावेळी लष्करच्या दोन कमांडरचाही खात्मा करण्यात आल्याचं एसपी वैद्य यांनी सांगितलं होतं. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता.