Jammu Kashmir: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:02 PM2021-10-13T16:02:09+5:302021-10-13T16:04:13+5:30
मंगळवारी शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना ठार केलं.
श्रीनगर: सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोराच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं आहे. या चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे. काश्मीरच्या आयजीपींनी ही माहिती दिली आहे.
#UPDATE | Top JeM Commander terrorist Sham Sofi killed in Tral Encounter: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/kUDRIHk5XE
— ANI (@ANI) October 13, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलांना या भागात संशयित दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर विशेष ऑपरेशन राबवण्यात आले, यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. याला सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं, यात शाम सोफी ठार झाला. या घटनेनंतर सुरक्षा दलाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला असून, शोध मोहिम राबवली जात आहे.
बगाईच्या जंगलात शोधमोहीम सुरू
तिकडे पूंछ राजौरी परिसरातील बगाई जंगलातही सुरक्षा दलाने गेल्या दोन दिवसांपासून शोधमोहीम राबवली आहे. पुंछ भागातच दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद झाले होते. तेव्हापासून सुरक्षा दल दहशतवाद्यांचे ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
शोपियांमध्ये 5 दहशतवादी ठार
मंगळवारी शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना ठार केलं. इमाम साहिब परिसरातील तुलरान गावात मंगळवारी संध्याकाळपर्यंत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. याशिवाय फिरीपोरा भागात दोन दहशतवादी मारले गेले.