जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 10:52 AM2017-07-30T10:52:42+5:302017-07-30T10:54:33+5:30
सीमेवर सतर्क असलेले जवान सातत्याने पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावला आहे.
जम्मू-काश्मीर, दि. 30 - सीमेवर सतर्क असलेले जवान सातत्याने पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरुच आहेत. पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील चकमकीत सुरक्षा जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. आज सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु होती. यामध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा डाव उधळून लावत त्यांना यमसदनी पाठवले आहे. या ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक अद्याप सुरुच आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील एका घरात तळ ठोकून बसले होते. भारतीय लष्कराला माहिती मिळतास त्यांना घेरले. लष्कर आणि दहशतवाद्यांध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन्ही दहशदवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले. पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून नियंत्रण रेषेचं उल्लघंन आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतीय जवान पाकच्या या कृत्याला सडेतोड उत्तर देत आहेत. यामध्ये भारतीय जवानही शहीद होत आहेत.
J&K Pulwama encounter #UPDATE: Two terrorists killed in an encounter with security forces in Tahab area, operation continues.
— ANI (@ANI_news) July 30, 2017
नियंत्रण रेषेवर मागच्या अनेक महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कर त्याच भाषेत प्रयुत्तर देत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यादेखील भारतीय लष्कराने उद्धवस्त केल्या आहेत. तरीही पाकिस्तान अजून वठणीवर आलेला नाही. सीमेवर दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत मारले गेले होते.
लष्कराला मोठं यश
जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे.
कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा
यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु करण्याआधी संपुर्ण प्लान तयार केला जातो. तसंच कमीत कमी नुकसान करुन दहशतवाद्यांना कसं ठार करता येईल याकडेही लक्ष दिलं जातं".