रामबनमध्ये दरड कोसळल्यानं जम्मू-श्रीनगर हायवे बंद, 1500 वाहनं पडली अडकून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:54 PM2019-05-10T12:54:15+5:302019-05-10T12:54:27+5:30
रामबनमधल्या डिगडोलमध्ये दरड कोसळल्यामुळे काल रात्री श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरः रामबनमधल्या डिगडोलमध्ये दरड कोसळल्यामुळे काल रात्री श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करण्यात आला आहे. दरड कोसळून महामार्ग बंद झाल्यानं जवळपास 1500 वाहनं अडकून पडली आहेत. तर दुसरीकडे उधमपूरमध्ये शेकडोंच्या संख्येत वाहनांना थांबवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालक राजमार्ग उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु राजमार्ग अद्याप मोकळा करण्यात आलेला नाही. दिवसभर प्रवासी कडक उन्हात आणि गरमीमध्ये त्रासलेले होते.
दरड कोसळल्यामुळे महामार्ग रात्री आठच्या सुमारास बंद ठेवण्यात आला आहे. बुधवारी रात्री रामबन भागातल्या डिगडोलमध्ये अचानक दरड कोसळल्यानं राष्ट्रीय राजमार्ग बाधित झाला. राजमार्ग बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रात्री राजमार्ग उघडण्याचं काम सुरू केलं आहे. परंतु अनेक तास प्रयत्न करूनही महामार्ग पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी उधमपूरहून काश्मीर खोऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रतिबंध घातला आहे.
दरड कोसळल्यामुळे या राजमार्गावर 1500 वाहनं अडकून पडली आहेत. तर उधमपूरमध्ये शेकडो वाहनं खोळंबली आहेत. उधमपूरमधल्या जखैनी, भारतनगर, संगूर, रठियान, बट्टलबालियां, गरनई, मांड, टिकरीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहनांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनांत बसून प्रवासी ताटकळत आहेत.