मधुचंद्राच्या रात्री MBA पतीनं पत्नीसमोर ठेवली IAS होण्याची अट; पुढे भलताच प्रकार घडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:47 PM2021-12-06T15:47:19+5:302021-12-06T15:48:18+5:30
लग्नानंतर पहिल्याच रात्री गोल्ड मेडलिस्ट पतीनं पत्नीसमोर ठेवली मोठी अट
जमशेदपूर: मधुचंद्राच्या रात्री एका पतीनं पत्नीसमोर अट ठेवली. त्या अटीची पूर्तता करणं तिच्यासाठी अवघड होतं. त्यामुळे तिचा संसार होण्यापूर्वीच मोडला. एमबीए झालेल्या पतीनं पत्नीसमोर आयएएस बनण्याची अट ठेवली. यामुळे लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये संवाद झालेला नाही. सध्या महिला न्यायासाठी न्यायालयाच्या चकरा मारत आहे.
झारखंडच्या पूर्व सिंहभूममध्ये वास्तव्यास असलेल्या पल्लवी मंडलचा विवाह १८ जून २०१८ रोजी परसुडिहचा रहिवासी असलेल्या जयमाल्य मंडलशी झाला. पल्लवीचे वडील प्रदूत कुमार मंडल यांनी आशीर्वाद देत पल्लवीची पाठवणी केली. दोन वर्षांत आयएएस होण्याची अट पती जयमाल्य मंडल यांनी पत्नी पल्लवीसमोर ठेवली. आयएएस होण्यात अपयश आल्यास तुझा आणि माझा कोणताही संबंध नसेल असं म्हणत जयमाल्यनं टोकाची भूमिका घेतली.
जयमाल्य मस्करी करत असावा असं पल्लवीला सुरुवातीला वाटलं. मात्र एमबीएमध्ये सुवर्ण पदक विजेता असलेला जयमाल्य याबद्दल गंभीर होता. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी जयमाल्य मुलाखत देण्यासाठी निघाला. त्यानंतर तो बरेच दिवस घरी परतला नाही. घरी आला, त्यावेळी त्याचं वागणं बोलणं बदललं होतं. त्यामुळे पल्लवीच्या मनात संभ्रम निर्माण झाला.
सासू कृष्णा मंडल, सासरे भावेश मंडल, दीर देवमाल्या मंडल, जाऊ झुंपा मंडल यांनी आपले हाल केल्याचा आरोप पल्लवीनं केला. सासरी राहून नवऱ्यासोबतचं नातं आणि संसार वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास वाढत गेला, अशा शब्दांत पल्लवीनं तिची व्यथा मांडली. यानंतर पल्लवीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पल्लवी आणि तिचं कुटुंब न्यायासाठी प्रयत्न करत आहे.