दीड तास मालगाडीच्या दारात अडकलेला मजुराचा पाय; सहकाऱ्यांनी देवदूत बनून वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 10:22 AM2023-08-30T10:22:08+5:302023-08-30T10:22:53+5:30
एक व्यक्ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर सुमारे दीड तास तो अडकून राहिला होता.
बिहारमधील जमुई रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर सुमारे दीड तास तो अडकून राहिला होता. सहकारी मजुरांनी देवदूत बनून त्याला या संकटातून बाहेर काढलं. ही घटना जमुई रेल्वे स्थानकाजवळ बसवलेल्या रॅकशी संबंधित आहे, जिथे मालगाडीतून खताची पोती उतरवताना ही घटना घडली.
मजुराच्या साथीदारांनी यानंतर एकमेकांना सहकार्य करत दीड तासानंतर त्या व्यक्तीला तेथून बाहेर काढलं. मिळालेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यातील गिधौर ब्लॉक भागातील कुंधुर गावात राहणारा मजूर वीरेंद्र यादव जमुई रेल्वे स्टेशनवर मालगाडीतून रासायनिक खताची पोती उतरवत होता. ट्रेन सुरू होताच जवळपास 50 मजूर तिथे कामावर गेले. त्यांच्याकडून मालगाडीच्या बोगीतून खताच्या पिशव्या उतरवल्या जात होत्या.
वीरेंद्र यादवचा याच दरम्यान पाय घसरल्याने तो मालगाडीच्या दारात अडकला. खूप प्रयत्न करूनही त्याचा पाय बाहेर न आल्याने गोंधळ उडाला. त्याला बाहेर काढण्यासाठी लोकांनी खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. यानंतर तेथे काम करणाऱ्या मजुरांनी गॅस कटरने मालगाडीची बोगी कापण्यास सुरुवात केली. हळूहळू बोगी लोकांनी कापली. दरम्यान, वीरेंद्र यादवचे इतर साथीदार लोखंड गरम होऊ नये म्हणून त्याच्या पायावर पाणी टाकत राहिले.
दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वीरेंद्र यादवचा अडकलेला पाय बाहेर काढण्यात आला. त्याला वाचवल्यानंतर त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मालगाडीतून माल उतरवण्याचे काम करत असल्याचे वीरेंद्रने सांगितले. यामध्ये त्याच्यासोबत पहिल्यांदाच अशी धक्कादायक घटना घडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.