जनता परिवार एकवटला

By admin | Published: April 16, 2015 01:32 AM2015-04-16T01:32:21+5:302015-04-16T01:32:21+5:30

किमान सहा महिन्यांच्या कसरतीनंतर बुधवारी पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील सहा पक्षांच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

Jana family gathered | जनता परिवार एकवटला

जनता परिवार एकवटला

Next

विलीनीकरणावर शिक्कामोर्तब : मुलायमसिंह अध्यक्ष; नाव, चिन्हाची घोषणा शिल्लक
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
किमान सहा महिन्यांच्या कसरतीनंतर बुधवारी पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील सहा पक्षांच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा करण्यात आली. नवगठित पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या गळ्यात पडली आहे.
मुलायमसिंह यांच्या येथील निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला सहाही पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र नमनालाच नाराजी व असंतोषाचे दर्शन घडल्याने तूर्तास पक्षाचे नामकरण, निवडणूक चिन्ह आणि ध्वजाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
यादव हे संसदीय मंडळाचेही अध्यक्ष राहतील. पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि ध्वजाबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नसून त्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी या बैठकीनंतर दिली.
मतभेदांचा ‘अपशकून’
समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव बैठकीला गैरहजर राहिले. राज्यसभेत त्यांच्या जागी शरद यादव यांच्याकडे नेतृत्व देण्याचा प्रस्ताव असल्याने रामगोपाल नाराज झाले आहेत. सपाचे संख्याबळ जास्त असले तरी दोन्ही सभागृहांत याच पक्षाकडे नेतृत्व देता येणार नाही.


त्यातूनच नवा प्रस्ताव समोर आल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला मुलायमसिंह यांच्यासह जद (एस)चे अध्यक्ष माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, शरद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौटाला, समाजवादी जनता पक्षाचे अध्यक्ष कमल मोरारका, जेडीयूचे सरचिटणीस के. सी. त्यागी उपस्थित होते.

जनता परिवाराचे संख्याबळ
पक्ष लोकसभा राज्यसभा
सपा ०५ १५
राजद ०४ ०१
जेडीयू ०२ १२
जेडी(एस) ०२ ०१
लोकदल ०२ ०१

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी सहा पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचालींना सहा महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी मुलायमसिंग यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पुढील वाटचाल ठरली होती. विलीनीकरणासंबंधी सर्वाधिकारही मुलायम यांनाच देण्यात आले होते.

विलीनीकरणाने बिहारमधील विधानसभा निवडणुकीत कोणताच प्रभाव पडणार नाही. ३-४ तलवारी एकाच म्यानामध्ये कशा राहणार?
- सुशीलकुमार मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते
एकजुटीचा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही. १९९१ आणि ९६ मध्ये जनता परिवाराची एकजूट होण्याची आणि पुन्हा शकले पडण्याचे अनेक प्रयोग झाले आहेत.
- पी. सी. चाको, काँग्रेसचे प्रवक्ते

 

Web Title: Jana family gathered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.