जनता बेजार, पण खासदारांना हवा आहे १ लाख पगार
By admin | Published: July 2, 2015 10:20 AM2015-07-02T10:20:01+5:302015-07-02T12:42:00+5:30
देशात अच्छे दिनाची प्रतिक्षा करुन जनता त्रस्त झाली असतानाच देशाचे खासदार व माजी खासदारांना पगारवाढ हवी आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - देशात अच्छे दिनाची प्रतिक्षा करुन जनता त्रस्त झाली असतानाच देशाच्या खासदार व माजी खासदारांना पगारवाढ हवी आहे. खासदारांच्या पगारात १०० टक्के तर माजी खासदारांच्या पेंशनमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ करावी अशी शिफारस संसदेच्या समितीने केली आहे. विशेष म्हणजे या शिफारशींचे सर्वपक्षीय खासदारांनी समर्थन केले आहे.
भाजपाचे वाचाळवीर खासदार योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षेताखाली संसदीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने आजी - माजी खासदारांना मिळणा-या सुविधा व वेतनांचा अभ्यास करत त्यामध्ये बदल सुचवले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या समितीने तब्बल ६० शिफारशी केल्या आहेत. खासदारांच्या वेतनात शेवटची वाढ २०१० मध्ये झाली होती, खासदारांना सरकारी कर्मचा-यांसारखा महागाई भत्ताही मिळत नाही हे कारण देत समितीने खासदारांच्या वेतनात १०० टक्के म्हणजेच दुप्पटीने वाढ करण्याची शिफारस केली आहे. सध्या खासदाराला प्रति महिना ५० हजार रुपये ऐवढे वेतन मिळते. त्यामुळे ही शिफारस मान्य झाल्यास खासदारांचा पगार थेट १ लाख रुपयांच्या घरात पोहोचेल. याशिवाय माजी खासदारांच्या निवृत्ती वेतनातही ७५ टक्क्यांनी वाढ करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऐरवी प्रत्येक विषयांवर खासदारांमध्ये राजकीय मतभेद असले तरी पगारवाढीच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदारांचे एकमत असल्याचे दिसते.
समितीने केलेल्या अन्य महत्त्वाच्या शिफारशी
> वेळोवेळी खासदारांच्या पगारात वाढ करणे.
> माजी खासदारांना वर्षभरात देशभरात मोफत २० ते २५ हवाई यात्रा करण्याची परवानगी द्यावी.
> प्रत्येक खासदारांना त्यांच्या खासगी सचिव किंवा अन्य व्यक्तीसाठी एक अतिरिक्त फर्स्ट क्लास रेल्वे पास देण्यात यावा.
> केंद्रसरकारतर्फे दिल्या जाणा-या आरोग्य सुविधांचा लाभ खासदाराच्या कुटुंबासमवेतच त्यांच्या नातवंडांनाही देण्यात यावा.