'या' व्यक्तीने जान्हवी कपूरला दिली आई श्रीदेवीच्या निधनाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 11:13 AM2018-02-26T11:13:17+5:302018-02-26T11:13:17+5:30
श्रीदेवी यांची अकाली एक्झिट त्यांच्या परिवारासाठी मोठा धक्का आहे.
मुंबई- शनिवारी रात्री बॉलिवूडच्या हवाहवाईने जगाचा निरोप घेतला. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्त सगळ्यांनाच धक्का देणार आहे. श्रीदेवी यांची अकाली एक्झिट त्यांच्या परिवारासाठी मोठा धक्का आहे. श्रीदेवी या दुबईमध्ये अखेरच्या घटना घेत असताना त्यांचे पती बोनी कपूर व लहान मुलगी खुशी तेथे होती. पण मोठी मुलगी जान्हवी कपूर तेथे नव्हती. सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने जान्हवी दुबईला लग्नासाठी गेली नव्हती. आईच्या शेवटच्या क्षणी तिच्याबरोबर राहता न आल्याची खंत जान्हवीच्या मनात कायमच राहील.
श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर जान्हवी कपूरला ही बातमी पहिल्यांदा दिग्दर्शक करण जोहरने सांगितली. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, करण जोहरला श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजल्यावर करण जोहर लगेचच जान्हवी कपूरच्या घरी गेला. त्यानंतर घरी असलेल्या जान्हवीला घेऊन करण जोहर जान्हनीचे काका अनिल कपूर यांच्या घरी तिला घेऊन गेला.
अभिनेत्री श्रीदेवी यांनी मुलगी जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूसाठी करण जोहरवर विश्वास ठेवला. करण जोहरच्या धडक या सिनेमातून जान्हवी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मुलीला चंदेरी पडद्यावर पाहणं, हे श्रीदेवीचं स्वप्न होतं पण त्यांचं ते स्वप्न अधुरं राहिलं.
जान्हवी कपूर लवकरच धडक या सिनेमातून बॉलिवूडमधील करिअर सुरू करते आहे. सिनेसृष्टीत पदार्पणाआधीच जान्हवीची श्रीदेवी यांच्याशी तुलना केली जाते आहे. एका मुलाखती दरम्यान श्रीदेवीने जान्हवी व स्वतःच्या तुलनेबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. भविष्यात माझी व जान्हवीची तुलना होणार हे मला माहिती आहे, म्हणूनच त्यासाठी मी तिला आत्तापासून तयार करते आहे, असं श्रीदेवी यांनी म्हंटलं होतं.
जान्हवीच्या पहिल्या सिनेमाविषयी श्रीदेवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या धडक या सिनेमात जान्हवी कपूर अभिनेता ईशान खट्टरबरोबर काम करणार आहे. जान्हवीने माझ्याप्रमाणेच सिनेसृष्टीत नाव कमवावं, अशी श्रीदेवी यांची इच्छा होती.