जनता दलाचे सहा तुकडे पुन्हा एकत्र
By Admin | Published: April 16, 2015 02:31 AM2015-04-16T02:31:45+5:302015-04-16T02:31:45+5:30
१० वर्षांहून अधिक काळ स्वतंत्रपणे आणि प्रसंगी परस्परांविरुद्ध लढलेल्या ‘जनता’ परिवाराच्या सहा तुकड्यांचे बुधवारी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरण झाले.
नेतृत्व मुलायमसिंह यांच्याकडे : आता वेगळे होणार नसल्याची ग्वाही
नवी दिल्ली : मूळच्या जनता दलातून बाहेर पडून गेल्या १० वर्षांहून अधिक काळ स्वतंत्रपणे आणि प्रसंगी परस्परांविरुद्ध लढलेल्या ‘जनता’ परिवाराच्या सहा तुकड्यांचे बुधवारी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरण झाले.
या सहा पक्षांच्या नेत्यांच्या मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शरद यादव यांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत, असे जाहीर केले. यामुळे समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, भारतीय राष्ट्रीय लोकदल, जनता दल (सेक्युलर) आणि समाजवादी जनता दल या सहा पक्षांचा मिळून एकच पक्ष स्थापन होईल.
मात्र या नव्या पक्षाचे नाव, निशाणी व झेंडा काय असेल हे अद्याप ठरलेले नाही. हे ठरविण्यासाठी जनता दल (सेक्युलर)चे एच. डी. देवेगौडा, राजदचे लालूप्रसाद यादव, लोकदलाचे ओम प्रकाश चौटाला, जदयूचे शरद यादव, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव आणि समाजवादी जनता पार्टीचे कमल मोरारका यांची एक समिती नेमण्यात आली आहे. आम्ही पुन्हा वेगळे होणार नाही व जनतेच्या आकांक्षा पूर्ण करू, अशी ग्वाही या सर्व नेत्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जनता परिवारातील या पक्षांकडे आता बिहार व उत्तर प्रदेश या दोनच राज्यांची सत्ता आहे. बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक लवकरच होऊ घातलेली आहे. मात्र अशी विलीनीकरणे यापूर्वीही यशस्वी झाली नव्हती व आताही त्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही, असे म्हणून भाजपाने या घोषणेची संभावना केली.