शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला
By admin | Published: May 30, 2015 11:43 PM2015-05-30T23:43:43+5:302015-05-30T23:43:43+5:30
जपानच्या किनारपट्टी भागात शनिवारी शक्तिशाली भूकंप झाला. ७.८ एवढ्या तीव्रतेच्या धक्क्यामुळे राजधानी टोक्योतील इमारती हादरण्यासह वाहनांचे ‘अलार्म’ वाजू लागले.
टोकियो : जपानच्या किनारपट्टी भागात शनिवारी शक्तिशाली भूकंप झाला. ७.८ एवढ्या तीव्रतेच्या धक्क्यामुळे राजधानी टोक्योतील इमारती हादरण्यासह वाहनांचे ‘अलार्म’ वाजू लागले. रिश्टर स्केलवर तीव्रता प्रचंड असूनही त्सुनामी उसळण्याचा धोका नाही, असे प्रशांत त्सुनामी इशारा केंद्राने सांगितले.
स्थानिक वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता झालेल्या या भूकंपामुळे इमारती हलू लागल्या, असे एका वृत्तसंस्थेच्या वार्ताहराने सांगितले. भूकंपामुळे कोणत्याही स्वरूपाची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागरात ६७६ कि. मी. खोलीवर होता. अमेरिकी भूगर्भशास्त्र सर्वेक्षणने ही माहिती दिली.
भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असलेल्या चिचिजिमा येथील एक नागरिक योशियुकी सासामो यांनी भूकंपामुळे घरे प्रचंड हलल्याचे सांगितले. सासामो चिचिजिमा येथे पारंपरिक विश्रामगृह चालवितात. ते म्हणाले, सुरुवातीला सौम्य भूकंप झाला आणि तो थांबला. त्यानंतर शक्तिशाली भूकंप झाला. हा एवढा शक्तिशाली होता की, मी सरळ उभा राहू शकलो नाही, तसेच चालूही शकलो नाही.
टोक्योतील प्रमुख विमानतळ असलेल्या नरिता विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय राजधानीतील रेल्वेसेवाही तात्पुरीत थांबविण्यात आली असून शहरातील एक फुटबॉल सामनाही काही काळासाठी थांबविण्यात आला.
जपानमध्ये मार्च २०११ मध्ये समुद्रतळाशी झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे देशाच्या ईशान्य किनाऱ्यावर त्सुनामी उसळली होती. या त्सुनामीत हजारो नागरिकांचा बळी जाण्यासह फुकूशिमा अणु दुर्घटनाही घडली होती. यात किनाऱ्याजवळील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली होती. (वृत्तसंस्था)
४नवी दिल्ली : दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात शनिवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक घरांमधून बाहेर आले.
४हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू जपान होता.यापूर्वी २५ एप्रिल आणि १२ मे रोजी नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाचे धक्के दिल्ली आणि परिसरात अनुभवण्यात आले होते.
अमेरिका, न्यूझीलंडमध्येही ५.५ तीव्रतेचे धक्के
४जपानशिवाय अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात व न्यूझीलंडमध्येही ५.५ तीव्रतेचे धक्के जाणवले. मात्र, कोणत्याही हानीचे अद्यापपर्यंत वृत्त नाही.
स्टेडियममध्ये स्तब्धता
४भूकंप झाला तेव्हा टोक्योतील बीएमडब्ल्यू स्टेडियमवर फुटबॉल सामना सुरू होता. तेव्हाच गोलफलकावर भूकंपाचा इशारा झळकला. स्टेडियममध्ये उपस्थित सर्व फुटबॉलप्रेमींना हा धक्का जाणवला. स्टेडियममधील अनेक जण आपल्या आप्तेष्टांना दूरध्वनी करून त्यांची ख्यालीखुशाली विचारताना दिसत होते.
४हा भूकंप एवढा शक्तिशाली होता की, जपानची राजधानी टोक्योत एक मिनिट इमारती हलत होत्या. भूकंपामुळे लोक घाबरून घरातून बाहेर रस्त्यावर आले.
४भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागरातील बोनीन बेटाजवळ होता. जपानला कालही दोन धक्के बसले होते; मात्र त्यांची तीव्रता पाचहून कमी होती. यापूर्वी १२ मे रोजी जपानमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता.