भारतात धावणार जपानी बुलेट ट्रेन
By Admin | Published: December 10, 2015 01:28 PM2015-12-10T13:28:12+5:302015-12-10T13:28:12+5:30
भारतातील पहिल्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या उभारणीचे कंत्राट जपानला मिळालं आहे. जपानबरोबर चीनही या स्पर्धेत होता.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - भारतातील पहिल्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या उभारणीचे कंत्राट जपानला मिळालं आहे. जपानबरोबर चीनही या स्पर्धेत होता. मात्र कमी खर्च आणि जपानकडून बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाचे हस्तांतरण यामुळे या स्पर्धेत जपानने बाजी मारली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावणार असून, भविष्यात दिल्लीपर्यंत या मार्गाचा विस्तार होऊ शकतो.
९८ हजार कोटींच्या या प्रकल्पाला बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पुढच्या आठवडयात जपानचे पंतप्रधान शिंधो अॅबे भारत दौ-यावर येत आहेत. त्यावेळी या प्रकल्पाची घोषणा होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. जपानच्या शिंकासेन सिस्टीमचा सुरक्षा रेकॉर्ड आणि वेळेचा रेकॉर्ड उत्तम आहे असे निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगारीया यांनी सांगितले.
चीनच्या बुलेट ट्रेनला चारवर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्याशिवाय चीनच्या बुलेट ट्रेनच्या डिझाईन आणि व्यवस्थापनात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे चीनवर मात करत जपानने या स्पर्धेत बाजी मारली.