बुलेट ट्रेनला जपानी कंपन्यांचे पोलाद?, ‘मेक इन इंडिया’ धोरणाला बसणार तडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:10 AM2018-01-19T03:10:55+5:302018-01-19T03:11:14+5:30
भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला पोलाद पुरवठ्याचे कंत्राट मिळवण्यासाठी जपानच्या प्रमुख पोलाद आणि अभियांत्रिकी कंपन्या सरसावल्या असल्याचे सूत्रांनी म्हटले.
नवी दिल्ली/टोक्यो : भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला पोलाद पुरवठ्याचे कंत्राट मिळवण्यासाठी जपानच्या प्रमुख पोलाद आणि अभियांत्रिकी कंपन्या सरसावल्या असल्याचे सूत्रांनी म्हटले. १७ अब्ज अमेरिकन डॉलरची ही कंत्राटे जपानने मिळवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आर्थिक धोरणाला मोठा तडा बसणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाला जपानकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असून, रेल्वे मार्गांसाठी जे महत्त्वाचे घटक लागणार आहेत त्यातील ७० टक्के जपानच्या कंपन्यांकडून पुरवले जाणार आहेत, असे या विषयाशी संबंधित असलेल्या पाच सूत्रांनी सांगितले. यावर भाष्य करायला पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने नकार दिला. या प्रकल्पात गुंतलेल्या जपानच्या वाहतूक मंत्रालयातील अधिकाºयाने सांगितले की, प्रकल्पाच्या महत्त्वाच्या घटकांच्या पुरवठ्याच्या धोरणावर दोन्ही देश अजूनही काम करीत आहेत व येत्या जुलैच्या जवळपास योजना तयार असेल. या अधिकाºयाने स्वत:चे नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
पुढील वर्षी मोदी यांना लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे असून, देशात लक्षावधी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे दडपण त्यांच्यावर आहे. मोदी यांच्या टीकाकारांचे म्हणणे असे आहे की, बुलेट ट्रेन प्रकल्प हा पैशांचा अपव्यय असून तो पैसा अधिक चांगल्यारीतीने वापरता आला असता. जपानच्या कंपन्यांनी भारतीय कंपन्यांची कार्यक्षमता आणि ठराविक वेळेत काम पूर्ण करण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. (वृत्तसंस्था)
सप्टेंबर २०१७ मध्ये भारत आणि जपान यांच्यामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पावर दोन मुद्यांवर सहमती झाली. एक म्हणजे मेक इन इंडियाला प्रोत्साहन आणि दुसरे म्हणजे जपानने तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. यामुळे भारताला देशात उत्पादनाच्या सोयी उभारता येतील व जपानच्या तंत्रज्ञानाच्या आधारे रोजगार निर्मिती होईल, अशी आशा होती.