शिंजो आबेंसह मोदींचा 8 किमीचा रोड शो, जपानच्या पंतप्रधानांनी परिधान केलं मोदी जॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 03:48 PM2017-09-13T15:48:14+5:302017-09-13T18:35:51+5:30
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आले आहे. या दरम्यान ते आज अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत 8 किमीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रोड शो केला आहे. अहमदाबाद विमानतळावरही जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंची खास व्यवस्था करण्यात आली होती. शिंजो आबेंच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीनं हजर राहिले आहेत.
अहमदाबाद, दि. 13 - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आले आहे. या दरम्यान ते आज अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत 8 किमीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रोड शो केला आहे. या दरम्यान शिंजो आबे यांनी मोदी जॅकेट घातल्यानं अनेकांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं. अहमदाबाद विमानतळावरही जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंची खास व्यवस्था करण्यात आली होती. शिंजो आबेंच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीनं हजर राहिले होते. रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिंजो आबेंसह सिदी सैय्यद मशिदीलाही भेट दिली आहे. बुलेट ट्रेनचा उद्या भूमिपूजन सोहळा होणार असून, यानिमित्तानं शिंजो आबे भारताच्या दौ-यावर आले आहेत. त्यांच्या या भेटीत गुजरातमध्ये गुंतवणुकीचे 15 करार होणार आहेत.
अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंतच्या या आठ किलोमीटरच्या मार्गावरील रोड शोमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले गेले आहेत. आबेंनी साबरमती गांधी आश्रमालाही भेट दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्यासोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी आश्रमातला चरखा शिंजो आबे व त्यांच्या पत्नीला दाखवला आहे. सिदी सय्यद मशिदीतील दगडांच्या नक्षीकामाचीही शिंजो आबेंनी भरभरून स्तुती केली. 1917 ते 1930 या काळात महात्मा गांधींनी साबरमती आश्रमात वास्तव्य केले होते. आठ किलोमीटरच्या रोड शोच्या संपूर्ण मार्गामध्ये साबरमती रिव्हरफ्रंटचाही समावेश असून, एकूण 28 छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. जिथे 28 राज्यांतील कलाकार आपल्या पारंपरिक वेशभूषेत नृत्यकला सादर करतील. विशिष्ट प्रकारच्या दगडी बांधकामामुळे ही मशिद लक्ष वेधून घेते. यावेळी दोन्ही नेत्यांसमोर शहरातील पुरातन वास्तूंचे प्रेझेंटेशन केले आहे. उद्या गुरुवारी दोन्ही नेते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी करतील. अहमदाबाद-मुंबई मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे.
कशी असणार बुलेट ट्रेन ?
10 डब्यांच्या या बुलेट ट्रेनमध्ये 750 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल. या ट्रेनमुळे दोन शहरांमधला सात तासांचा प्रवास तीन तासांवर येणार आहे. पुढे या ट्रेनला 16 डब्बे असतील. त्यामधून एकाचवेळी 1200 जणांना प्रवास करता येईल. बुलेट ट्रेनच्या या एकूण प्रकल्पासाठी 1.10 लाख कोटींचा खर्च येणार आहे. त्यातील 88 हजार कोटी रुपये जपान कर्ज म्हणून देणार आहे. 2022 पर्यत हा प्रकल्प पूर्ण करायचा उद्देश आहे. त्याचवर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.