Jara Hatke: स्वत:च्याच लग्नाला जायचे विसरले, ओडिशातील आमदार बिजय दास आले अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:19 AM2022-06-21T06:19:32+5:302022-06-21T06:26:44+5:30
Jara Hatke: मित्रमंडळी किंवा जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसाेहळ्याला अनेक जण आवर्जून हजेरी लावतात. क्वचितच असे हाेते की आपण लग्नाला जाणे विसरताे. पण, मुद्दा जेव्हा स्वत:च्या लग्नाचा असेल तर?
भुवनेश्वर : मित्रमंडळी किंवा जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसाेहळ्याला अनेक जण आवर्जून हजेरी लावतात. क्वचितच असे हाेते की आपण लग्नाला जाणे विसरताे. पण, मुद्दा जेव्हा स्वत:च्या लग्नाचा असेल तर? ओडिशामध्ये एक जण स्वत:च्या लग्नाला जायचेच विसरला. ताेही चक्क आमदार. सत्ताधारी बिजू जनता दलाचे तिरताेल येथील आमदार बिजय शंकर दास हे स्वत:च्या लग्नाला गेलेच नाहीत. वधूने पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आपल्याला काेणी बाेलावलेच नाही, असा बहाणा करून त्यांनी वेळ मारून नेली.
दास यांचे साेमालिका हिच्यासाेबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू आहे. त्यांनी तिला लग्नाचे आश्वासनही दिले हाेते. नाेंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी त्यांनी १७ मे राेजी अर्जही दाखल केला हाेता. मात्र, १९ जून राेजी ठरलेल्या दिवशी ते नाेंदणी कार्यालयात पाेहाेचलेच नाहीत. बराच वेळ वाट पाहून साेमालिका हिने पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदाराने सारवासारव करून आपण पुढील ६० दिवसांमध्ये लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. साेमालिका यांचे म्हणणे आहे, की दास आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बाेलूनच लग्नाची तारीख ठरविण्यात आली हाेती.
६० दिवसांमध्ये करणार लग्न
दास म्हणाले, की माझी आई आजारी आहे. विवाहासाठी अर्ज दिल्यानंतर अजूनही ६० दिवस आहेत. मी कधीही या लग्नास नकार दिलेला नाही. मात्र, या तारखेबद्दल मला काेणी सांगितलेच नाही आणि बाेलाविलेदेखील नाही.