पोटनिवडणुकांत जारकीहोळी, सवदी यांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 02:02 AM2019-12-03T02:02:24+5:302019-12-03T02:02:41+5:30
पोटनिवडणुकांसाठी ५ डिसेंबरला मतदान होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, कागवाड व अथणी मतदारसंघांत चुरशीची निवडणूक होत आहे.
- दादा जनवाडे
निपाणी (जि. बेळगाव) : कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघांतील प्रचार अंतिम टप्प्यात असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. पोटनिवडणुकांसाठी ५ डिसेंबरला मतदान होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, कागवाड व अथणी मतदारसंघांत चुरशीची निवडणूक होत आहे. प्रचारात नेत्यांचे पक्षांतर हाच प्रमुख मुद्दा बनला आहे. या निवडणुकीत जारकीहोळी बंधू, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व जोल्ले दाम्पत्य यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कर्नाटकातील सत्तानाट्यानंतर एकूण १७ पैकी १५ मतदारसंघांत पोटनिवडणूक होत असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव प्रचार करीत आहेत. या पोटनिवडणुका मुख्यमंत्री येडियुरप्पा व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भवितव्य ठरवणार आहेत.
काँग्रेसमधून मंत्रीपद भूषविलेले रमेश जारकीहोळी हे भाजपतर्फे गोकाकच्या रिंगणात आहेत. काँग्रेसतर्फे लखन जारकीहोळी, तर निधर्मी जनता दलाकडून अशोक पुजारी रिंगणात आहेत. रमेश यांनी पाच वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. जारकीहोळी बंधंूचे नेहमीच बेळगाव जिल्ह्यावर वर्चस्व राहिले आहे.
यापूर्वी रमेश, सतीश व भालचंद्र हे वेगवेगळ्या पक्षांत असले तरी एकत्र असल्याचे नेहमी जिल्ह्याने पाहिले आहे; पण यावेळी मात्र रमेश व लखन या सख्ख्या भावांमध्ये लढत असून, यामुळे रमेश यांच्यासमोर गड राखण्याचे मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात लिंगायत मतदार अधिक असून, याचा फायदा अशोक पुजारी उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपने या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे दिली आहे.
श्रीमंत पाटील यांनी शिक्षण, सहकार, पाणी योजना, पतसंस्थांच्या माध्यमातून विकास केला आहे. या मतदारसंघात माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांचा मोठा प्रभाव आहे. त्याचा फायदा कागे यांना होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीवेळी कागवाड मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळाले होते. याचा फायदा श्रीमंत पाटील यांना होऊ शकतो. या मतदारसंघात निधर्मी जनता दलाचे श्रीशैल शेट्टी यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात असले, तरी निवडणूक दुरंगीच होत आहे.
अथणीमधून भाजपकडून महेश कुमठळ्ळी, तर काँग्रेसकडून गजानन मंगसुळी रिंगणात आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे महेश कुमठळ्ळी यांनी भाजप उमेदवार लक्ष्मण सवदी यांचा पराभव केला होता. हेच सवदी सध्या भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. सवदी यांना उपमुख्यमंत्रीपद मिळवून देण्यात आमदार महेश कुमठळ्ळी यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.
एकेकाळी विरोधात असलेल्या कुमठळ्ळी यांचा प्रचार करणे सवदी यांना भाग पडले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद भूषविताना सवदी यांना कुमठळ्ळी यांच्या विजयासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. या मतदारसंघात सवदी यांच्यासह मंत्री शशिकला जोल्ले व भाजप खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.