जैशकडून खिल्ली, पण पंतप्रधान मोदी समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 04:48 AM2016-01-10T04:48:09+5:302016-01-10T04:48:09+5:30
पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ला हाताळण्याच्या पद्धतीवरून देशभरात सुरू झालेली टीका आणि जैश-ए-मोहम्मदने उडविलेली भारताची खिल्ली या पार्श्वभूमीवर पंतप्रधान
पठाणकोट : पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ला हाताळण्याच्या पद्धतीवरून देशभरात सुरू झालेली टीका आणि जैश-ए-मोहम्मदने उडविलेली भारताची खिल्ली या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हवाईतळाचा दौरा केला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले. कारवाईत प्राण पणाला लावणारे जवान आमची शान असल्याचे गौरवोद्गार मोदी यांनी या वेळी काढले. पण अवघे सहा जण भारतीय लष्कराला भारी पडले, अशा भाषेत खिल्ली उडविणारा आॅडिओ जैशने जारी केला आहे.
गेल्या शनिवारी हवाईतळात घुसलेल्या सहाही दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला होता. त्यानंतर आठवडाभराने येथे आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी हवाईदल तळाचा फेरफटका मारत असताना काही जवानांसोबत हितगुज केले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल या वेळी मोदी यांच्यासमवेत होते. हवाईदल प्रमुख अरुप राहा आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हल्ला आणि त्याला देण्यात आलेल्या प्रत्युत्तराची सविस्तर माहिती दिली. मोदींच्या हवाईतळ दौऱ्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या टिष्ट्वटमध्ये पंतप्रधानांनी दहशतवादी हल्ला परतवून लावण्याकरिता घेण्यात आलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि सुरक्षा जवानांनी दिलेले चोख प्रत्युत्तर यावर समाधान व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. एका अन्य टिष्ट्वटमध्ये मोदी यांनी कारवाईदरम्यान विविध सुरक्षा संस्थांमधील समन्वयाचीही दखल घेतली. (वृत्तसंस्था)
हल्ल्याआधीच दोघे आत घुसले?
नवी दिल्ली : पठाणकोटमध्ये हवाईदल तळावर हल्ल्यापूर्वीच दोन दहशतवाद्यांचा एक गट येथे घुसला होता काय, याचा शोध राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दहशतवादी पठाणकोटला पोहोचण्याच्या २० तासांपूर्वीच दोन फिदायीन हल्लेखोर आत शिरले होते.
नंतर येणाऱ्या चार दहशतवाद्यांनी येथे पोहोचण्यासाठी गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांचे अपहरण केले. पठाणकोट हवाईदल तळावर एका सुरक्षित कोपऱ्यात पोहोचल्यावर या दोन दहशतवाद्यांनी आतील हालचालींवर नजर ठेवली आणि त्यामुळेच एनएसजी, वायुसेना आणि लष्कर कमांडोंवर दोन वेगवेगळ्या दिशांनी गोळीबार करण्यात येत होता.
दहशतवाद्यांच्या या दोन्ही गटांना गोळीबाराच्या माध्यमातून एकमेकांच्या पोझिशनबद्दल कळत होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सीमा चौक्यांची हवाई पाहणी
हवाईदल तळाच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळील आघाडीच्या चौक्यांची हवाई पाहणीही केली.
तीन दिवसांवर चाललेल्या धरपकड मोहिमेनंतर शुक्रवारी सुरक्षा दलाने संपूर्ण हवाईदल तळ सुरक्षित घोषित केला होता.
ध्वनिफीत : अवघ्या सहा जणांनी देशाला ढसढसा रडवले
इस्लामाबाद : ‘भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाईदल तळावर हल्ला करणाऱ्या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही’ अशा शब्दांत कुख्यात दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ने खिल्ली उडवली आहे. या संघटनेतर्फे वेबसाईटवर एक आॅडिओ क्लिप (ध्वनिफीत) अपलोड करण्यात आली असून, त्यात पठाणकोट हल्ला कसा घडवण्यात आला हे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात २ जानेवारी रोजी लष्करी वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाईदलाच्या तळावर घुसून हल्ला केला. तीन दिवसांच्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी सहाही अतिरेक्यांना यमसदनी धाडले; मात्र त्यात
७ जवान शहीद तर ५०हून अधिक जखमी झाले.
‘आम्ही एवढ्या मोठ्या देशाला ढसढसा रडविले,’ असेही या क्लिपमध्ये म्हटले आहे. तेथील (भारत) सरकार भित्रे असून, ते केवळ आमच्यावर आरोप करीत सुटले आहे,’ अशी संतापजनक भाषाही या आॅडिओत वापरण्यात आली आहे. एवढेच नाहीतर, जैशने या हल्ल्याचे दिव्य अर्थात महान असे वर्णन केले आहे.
पाकिस्तान सरकारला धमकी
‘पाकिस्तानचे नेते भारताने केलेल्या आरोपांसमोर का झुकतात? आमची लाज का काढतात,’ असा सवाल विचारत जैशने भारताने दिलेले पुरावे स्वीकारू नका, अशी धमकी पाक सरकारला दिली आहे.