हरियाणातील बुद्धिबळपटू अनुराधा बेनिवालचे जाट बांधवांना शांततेचे आवाहन
By admin | Published: February 24, 2016 03:25 PM2016-02-24T15:25:31+5:302016-02-24T15:29:05+5:30
ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे हरियाणा धुमसत असताना रोहतकच्याच एका तरूणीने व्हिडीओच्या माध्यमातून याबद्दल नाराजी दर्शवत हिंसक आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २४ - ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनामुळे धुमसलेले हरियाणा अद्याप पूर्णपणे शांत झालेले नसून राज्यात तणावाचे वातावरण कायम आहे. १९ जणांचा बळी घेणा-या या आंदोलनानंतर हिंसाचारग्रस्त जाटबहुल हिस्सार, हांसी, भिवानीमध्ये संचारबंदी अद्याप लावण्यात आलेली आहे. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्याच रोहतकमधील अनुराधा बेनिवाल या तरूणीने एका व्हिडीओच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे तसेच आपलेच राज्य न जाळण्याचे आवाहन केले आहे. २९ वर्षीय अनुराधा ही एक चेस चॅम्पियन असून तिने एक हिंदी पुस्तकाचे लेखनही केले आहे.
सध्या लंडनमध्ये असलेल्या अनुराधाने या व्हिडीओतून आपल्याचा (जाट) बांधवांना अनेक रोखठोक प्रश्न विचारत हिसांचार न करण्याचे आवाहन केले. गेल्या आठवड्याभरापासून जाट आंदोलनामुळे हरियाणा धुमसत असून त्याचे लोण उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्येही पोहोचले होते. बोलीभाषेतून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओत अनुराधाने या सर्व गोष्टींबाबात नाराजी नोंदवली आहे. ' मी जेव्हा बुद्धिबळ (चेस) शिकायला सुरूवात केली तेव्हा मला कोणीही माझी जात विचारली नव्हती ' असे सांगतानाच अनुराधाने जाट बांधवांना एकात्मतेचा तसेच हिंसाचार त्वरित थांबवण्याचा सल्ला दिला. या हिंसाचारामुळे फक्त राज्याला आर्थिक फटका बसणार नसून त्याचा राज्याच्या प्रतिमेवरही प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे तिने नमूद केले आहे.
' जेव्हा तुम्ही राज्यातील मालमत्ता जाळता तेव्हा तुम्ही स्वत:च्याच जमिनीवर विध्वंस घडवत असता, त्यात तुमची स्वत:चीच झाडं, घरं जळत असतात, इतर कोणाचेच नुकसान होत नाही. तुम्ही केलेले नुकसान पाहिल्यानंतर कोणती कंपनी (उद्योगासाठी) या राज्यात येईल? आपल्या राज्याचा विकास कसा होईल?' असा प्रश्न विचारत या सर्व बाबींमुळे आपल्याच राज्याचे नुकसान होत असल्याचे तिने स्पष्ट केले. ' आपला विकास करण्यासाठी तुम्हाला स्वत:लाच तशी परिस्थिती निर्माण करावी लागेल' असेही तिने नमूद केले.
अनुराधाच्या या व्हिडीओमुळे अद्याप पुरेसा प्रभाव पडला नसला तरीही अनेक लोकांनी तिच्या या प्रयत्नांचे कौतुक केले असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
जाट आंदोलनाचा उत्तरेकडील राज्यांमधील रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. सुमारे ७३६ रेल्वे रद्द केल्या असून, १०५ गाड्या अन्य मार्गाने वळत्या केल्या. रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूकदारांना सुमारे २०० कोटींचा फटका बसला. पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर या राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील सेवा ठप्प झाल्या आहेत.