मोदी फॅक्टरसह जाट, गुर्जरांमुळे गड राखण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 03:38 AM2019-05-24T03:38:42+5:302019-05-24T03:39:05+5:30
पाचही केद्रीय मंत्र्यांचा विजय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाचा पराभव
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव मतदारांवर दिसून आला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे सिंदिया यांच्यावर मतदार नाराज होते. ते मतदान यंत्रांतून दिसून आले. मात्र, लोकसभा निवडणुकीत केवळ मोदी फॅक्टर चालल्याचे निवडणूक निकालांवरुन दिसून येत आहे. पक्षाने २०१४ मध्ये २५ जागांवर विजय मिळविला होता. या जागा कायम राखण्यात भाजपला यश आले आहे. २४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडी असून, ‘एनडीए’चा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा १ उमेदवार आघाडीवर असल्याचे मतमोजणीतून दिसून आले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येकी बारा सभा घेतल्या. काँग्रेसतर्फे शेतकरी कर्जमाफी, रोजगार व इतर योजना आदी मुद्द्यांचा निवडणुकीत प्रचार करण्यात आला. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. तसेच राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत पाठ फिरविलेला गुर्जर व जाट समाजही भाजपच्या बाजूने उभा राहिल्याचे चित्र दिसून आले. संपूर्ण निवडणुकीदरम्यान मतदारांवर मोदींचा प्रभाव कायम राहिल्याने त्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे.
निकालाची कारणे
यंदाही मतदारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच प्रभाव दिसून आल्याने जागा कायम राखण्यात यश.
पंतप्रधान मोदींनी प्रचारात प्रभावीपणे मांडलेल्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याला मतदारांचा कौल
या नेत्यांचा परिणाम : या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी फॅक्टर चालले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदिया यांचाही प्रभाव काही अंशी दिसून आला. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा प्रभाव चालला नाही.