जाट आंदोलन थंडावले; तणाव कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 02:43 AM2016-02-24T02:43:42+5:302016-02-24T02:43:42+5:30
पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध संतप्त जमावाने रोहतक येथे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांना घातलेला घेराव वगळता मंगळवारी कोणतीही अनुचित घटना न घडल्यामुळे जाट आंदोलनाची
चंदीगड : पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध संतप्त जमावाने रोहतक येथे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांना घातलेला घेराव वगळता मंगळवारी कोणतीही अनुचित घटना न घडल्यामुळे जाट आंदोलनाची धग कमी झाल्याचे; मात्र तणाव कायम असल्याचे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे हिंसाचारग्रस्त जाटबहुल हिस्सार, हांसी, भिवानीमध्ये संचारबंदी कायम असून ती केवळ रोहतकमध्ये चार तासांसाठी शिथिल करण्यात आली.
हरियाणामध्ये ‘रास्ता रोको’ करण्यासाठी ठिकठिकाणी लावलेले अडथळे हटविण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. अंबाला- दिल्ली महामार्गावरील वाहतूक पानीपतपर्यंत सुरू झाली. सोनीपत येथील स्थिती पूर्ववत होताच पुढील वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जाट आंदोलनात एकूण १९ जण मृत्युमुखी पडले आहेत. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या चिथावणीमुळेच आंदोलन हिंसक झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्याचे खंडण करताना हुड्डा म्हणाले की संबंधित पुरावा बनावट आहे. मात्र काँग्रेसने याबाबतचे स्पष्टीकरण हुड्डा यांच्याकडे मागितले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने केंद्रीय नोकऱ्यांमध्ये जाटांना आरक्षण देण्याच्या मुद्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री खट्टर यांना दिल्लीला पाचारण केले आहे. (वृत्तसंस्था)