Delhi Violence : आप-काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत हिंसा भडकवली : जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 04:43 PM2020-02-27T16:43:13+5:302020-02-27T17:00:20+5:30
हा दोन दिवसांचा हिंसाचार नसून यासाठी लोकांना दोन महिन्यांपासून भडकवले जात होते.
नवी दिल्ली : रविवारी सुरु झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत हिंसाचार आता थांबला आहे. बुधवारी दिल्लीत हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही, परंतु शहरात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. "दिल्लीतील हिंसाचाराला आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जवाबदार असल्याचा" आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधताना जावडेकर म्हणाले की, दंगलग्रस्त भागात जाण्याऐवजी मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीच्या विधानसभेत हिंसाचारात मृत्यू झालेल्या लोकांचा धर्म सांगत आहेत. तर बुधवारी पत्रकार परिषद घेणाऱ्या सोनिया गांधी आज राष्ट्रपतींच्या दारावर जाऊन, भाजपवर आरोप करत आहे.
तसेच हा दोन दिवसांचा हिंसाचार नसून यासाठी लोकांना दोन महिन्यांपासून भडकवले जात होते. आर-पारची लढाई असून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल असे वक्तव्य सोनिया गांधींनी सीएए कायदा लागू झाल्यानंतर राम लीला मैदानावर झालेल्या सभेत केले होते. तिथूनच चिथावणी देण्याचे काम सुरु झाले असल्याचे आरोप जावडेकर यांनी केला आहे.
आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या घरात दंगल घडवण्याच्या तयारीसाठी दगड, पेट्रोल बॉम्ब जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकांना भडकवण्यासाठी 'जिन्ना वाली आझादी', 100 करोड वर 15 करोड भारी, आसामला वेगळ करावे लागेल असे चिथावणी देणारे विधान केली जात असताना, आप आणि काँग्रेसचे नेते शांत राहिले, असल्याचे आरोपही जावडेकर यांनी केला.