जावडेकर, निशंक यांना भोवली संघाची नाराजी, शैक्षणिक धोरणाला उशीर; ...म्हणून बदलांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 07:51 AM2021-07-08T07:51:54+5:302021-07-08T07:52:11+5:30
कोरोना कालावधीत केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. विरोधकदेखील आक्रमक झाले.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी फेरबदल झाले असून काही मोठ्या मंत्र्यांची गच्छंती झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना संघाची नाराजी भोवली. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात झालेला विलंब व त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवरून संघ पदाधिकाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले होते. दुसरीकडे प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांच्या अनावश्यक वक्तव्यांमुळेदेखील संघाने नाराजी वर्तविली होती.
कोरोना कालावधीत केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. विरोधकदेखील आक्रमक झाले. या कालावधीत मंत्रालयांमधील कामांपेक्षा काही मंत्री त्यांच्या वक्तव्यांसाठीच चर्चेत होते. जावडेकर, रविशंकर प्रसाद यांच्याकडून तर ट्विटर, टुलकिट इत्यादी प्रकरणांत अनावश्यक वक्तव्ये देण्यात आली, असे संघ पदाधिकाऱ्याचे मत होते. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी संघाचा अनेक दिवसांपासूनचा आग्रह होता.
जावडेकर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्रिपदी असताना २०१६ ते २०१९ कालावधीत यादृष्टीने प्रभावी पावले उचलण्यात आली नव्हती. खुद्द सरसंघचालकांनी दोन वर्षांअगोदर विजयादशमीच्या भाषणात यासंदर्भात आम्हाला प्रतीक्षाच असल्याचे वक्तव्य केले होते. रमेश पोखरियाल निशंक यांच्या कालावधीत नवीन धोरण लागू झाले, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली नाही. यामुळे संघात नाराजीचा सूर होता.