'जावेद अख्तर यांना विमानाने अफगाणिस्तानात पाठवा'; विहिंप कार्यकर्ते संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:01 PM2021-09-07T13:01:29+5:302021-09-07T13:08:38+5:30
Javed Akhtar And RSS : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जावेद अख्तर यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. तसेच नाराज विहिंप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर जावेद अख्तर यांचा पुतळा जाळला.
नवी दिल्ली - प्रसिद्ध गीतकार, लेखक, कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये याविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जावेद अख्तर यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. तसेच नाराज विहिंप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर जावेद अख्तर यांचा पुतळा जाळला आणि जोरदार घोषणाबाजी केली.
"आरएसएसची तुलना तालिबानशी करणाऱ्या जावेद अख्तर यांना विमानानं अफगाणिस्तानात पाठवलं पाहिजे" असं म्हणत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. अख्तर यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. त्यांनी एका कापडी पुतळ्यावर जावेद अख्तर यांचा फोटो चिटकवला आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विहिंप कार्यकर्त्यांनी रोडवरच वाहतूक थांबवून खूप गोंधळही घातला.
"अशा लोकांना देशात राहण्याचा कोणताही हक्क नाही"
"जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केली आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा लोकांना विमानात बसवून अफगाणिस्तानात पाठवायला हवं. अशा लोकांना देशात राहण्याचा कोणताही हक्क नाही. अख्तर यांच्याविरोधात सरकारने कारवाई केली नाही तर कार्यकर्ते आपल्या पद्धतीने वागतील" असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचे सांगत जावेद अख्तर यांनी टीकेची झोड उठवली. यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी जावेद अख्तर यांच्या संघाबाबत केलेल्या विधानावरून प्रत्युत्तर दिले आहे.
"जावेद अख्तर यांचे विधान बेशरमपणाचा कळस"
RSS, विश्व हिंदू परिषदसुद्धा तालिबानी वृत्तीचेच आहेत, हे जावेद अख्तर यांचे विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस असून, समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरतात की, या हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते टीका करत आहेत. हिंमत असेल तर, अफगाणिस्तानात जा आणि तालिबानवर टीका करा, असे हल्लाबोल करत जावेद अख्तर आपले विधान मागे घ्यावे, हिंदू समाजाची क्षमा मागावी. नाहीतर तुमच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला जाईल, असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.