पाकच्या गोळीबारात काश्मिरात जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 03:49 AM2020-06-23T03:49:16+5:302020-06-23T03:49:20+5:30
या महिन्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांची संख्या आता चार झाली आहे.
जम्मू : पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर सोमवारी विनाकारण केलेल्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद झाला. या महिन्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांची संख्या आता चार झाली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने आणि रेंजर्सनी पूंछ सेक्टरमध्ये कृष्णा घाटीत नियंत्रण रेषेवरील तसेच हिरानगर (जिल्हा कठुआ) सेक्टरमधील ठाण्यांना लक्ष्य केले होते. या माऱ्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या लष्कराने कोणतेही कारण नसताना शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. त्यात हवालदार दीपक कारकी हे शहीद झाले, असे जम्मूस्थित लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले. आनंद म्हणाले, पहाटे साडेपाच वाजता सेक्टरमध्ये गोळीबार सुरू झाला. त्याला भारताने जोरदार प्रत्त्युतर दिले. या माºयात पाकिस्तानची काही जीवितहानी झाली का हे लगेच समजले नाही. ‘हवालदार कारकी हे धाडसी सैनिक होते. कर्तव्यावर असताना त्यांनी केलेला सर्वोच्च त्याग देशाला कायम स्मरणात राहील,’ असे कर्नल आनंद म्हणाले. या महिन्यात राजौरी आणि पूंछमध्ये गोळीबारात चार जवान शहीद झाले आहेत.
>हृदयविकाराने जवानाचा मृत्यू
लष्कराचे जवान नाईक सुरेंद्र सिंह यांचा जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील बालनोई येथे सोमवारी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे अधिकाºयाने सांगितले. सुरेंद्र सिंह हे अचानक बेशुद्ध पडले.