सॅल्युट ! घरासमोर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, तरीही 'तो' सीमारेषेवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 06:04 PM2020-01-20T18:04:11+5:302020-01-20T18:05:03+5:30
मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनिलचे गुरुवारी लग्न होणार होते.
श्रीनगर - सैन्यातील जवानांना कुटुंबापासून दूर रहावे लागते. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवानांना कधी-कधी घरच्यांना बोलायलाही मिळत नाही. मात्र, सैन्यातील एका जवानाला त्याच्या लग्नादिवशीही कर्तव्य बजावावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. देशसेवेसाठी त्याग आणि समर्पण हे जवानांच्या रक्तातच भिनलेल असतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हिमाचलच्या मंडी येथील मूळ रहिवासी असलेला हा जवान काश्मीरमधील मोठ्या बर्फवृष्टीमुळे तेथून बाहेरच पडू शकला नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वर्तमानपत्रातील बातमी ट्विट करत भारतीय सैन्याच्या जवानांच्या त्याग अन् समर्पणाचं वर्णन केलंय. आधी लगीन कोंढण्याचं म्हणणाऱ्या तानाजीचीच आठवण ही बातमी वाचून झाल्याशिवाय राहणार नाही. सैन्य दलानेही ट्विटरवरुन अशीच प्रतिकिया देत, सैन्यातील जवानांसाठी देश सर्वप्रथम नंतर जीवन त्याची वाट बघेल, असे म्हटले आहे.
#LifeWillWaitThatsAPromise#IndianArmy Jawan misses wedding after #Kashmir Valley gets snowed in. Don't worry life will wait. #NationFirstAlways The bride's family agrees to a new date. Just another day in the life of a soldier.@adgpi@NorthernComd_IA@easterncomdpic.twitter.com/G1b1u5bCi6
— Chinar Corps - Indian Army (@ChinarcorpsIA) January 18, 2020
मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनिलचे गुरुवारी लग्न होणार होते. मात्र, गेल्या 2 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे तो काश्मीरमध्येच अडकून पडला. सुनिलच्या लग्नाची सर्व तयारी झाली होती, बुधवारी रितीरिवाजाप्रमाणे सगळे कार्यक्रमही पार पडले. आता, गुरुवारी लडभडोल येथील एका गावासाठी त्याची वरातही निघणार होती. दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या घराची मोठी सजावट केली होती. सनई-चौघडे वाजत होते, संगीत अन् नातेवाईकांची धूम होती. विशेष म्हणजे 1 जानेवारीपासून सुनिलच्या सुट्ट्याही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे, बांदीपोरा येथील ट्रांजिट कॅम्पवर तो पोहोचला होता. मात्र, खराब हवामानामुळे सर्वच रस्ते बंद होते. विमानही उड्डाण करू शकत नव्हते. त्यामुळे सुनिलने फोनवरुनच कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आपण लग्नाला येऊ शकत नसल्याचे सांगितले. सुनिलच्या फोनमुळे दोन्ही कुटुंबीयांची निराशा झाली पण, देशसेवा बजावणाऱ्या सुनिलचा आम्हाला गर्व असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं.