जया बच्चन ममतांच्या गोटात; तृणमूलच्या तिकिटावर लढवणार निवडणूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 09:50 AM2018-02-19T09:50:44+5:302018-02-19T09:52:04+5:30
समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे.
नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन या समाजवादी पक्षाची साथ सोडून तृणमूल काँग्रेसच्या गोटात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 एप्रिलला जया बच्चन यांच्या राज्यसभेतील खासदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. गेल्या तीन टर्म त्या समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. मात्र, राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत जया बच्चन पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. आगामी काही दिवसांतच पक्षाकडून याबद्दलची औपचारिक घोषणा होईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यापैकी 10 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 पैकी 312 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तर विधानसभेत झालेल्या पराभवामुळे समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे. त्यामुळे या जागेवर आत्तापासूनच अनेकांचा डोळा आहे.
तर दुसरीकडे तृणमुलच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे चार खासदार यंदा निवृत्त होत आहेत. त्यामुळे अनेकजणांनी खासदारकीच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आम्ही यावेळी आमच्या किमान दोन खासदारांना राज्यसभेत निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जया बच्चन यांनी ममता बॅनर्जी यांना सूचक संदेश पाठवायला सुरूवात केली होती. जया बच्चन या मूळच्या बंगाली असून त्यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. अनेकदा अमिताभ बच्चनदेखील जाहीर कार्यक्रमांमध्ये आपण 'बंगालचा जावई' असल्याचा उल्लेख करतात.
गेल्यावर्षी भाजपाच्या एका कार्यकर्त्याने ममता बॅनर्जी यांना ठार मारणाऱ्याला 11 लाखांचे इनाम देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जया बच्चन यांनी भाजपावर कडाडून टीका केली होती. तुम्ही गायींना वाचवू शकता, पण तुमच्या राज्यात महिलांना अत्याचारांना बळी पडावे लागत आहे, असे बच्चन यांनी म्हटले होते. यानंतरच्या काळात अमिताभ आणि जया बच्चन यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे जया बच्चन आणि ममता बॅनर्जी यांच्यातील जवळीक सातत्याने वाढत गेली.