जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदार; संपत्तीत 100 टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 10:04 AM2018-03-13T10:04:35+5:302018-03-13T10:04:35+5:30
विशेष म्हणजे २०१२ मध्ये जया बच्चन यांची संपत्ती 493 कोटी रुपये इतकी होती.
नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या देशातील सर्वात श्रीमंत खासदार ठरण्याची शक्यता आहे. त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने नुकताच आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्याजवळ 1000 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे जया बच्चन या देशातील सर्वात श्रीमंत खासदार ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा बहुमान खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांच्याकडे होता. सिन्हा तब्बल 800 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
विशेष म्हणजे २०१२ मध्ये जया बच्चन यांची संपत्ती 493 कोटी रुपये इतकी होती. मात्र, आता यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नावे 460 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून 540 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बच्चन दाम्पत्याकडे सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या मौल्यवान दागिन्यांच्या स्वरुपात 62 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये जया बच्चन यांच्याकडील 26 कोटींच्या दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय, बच्चन दाम्पत्याकडे 12 गाड्या असून त्यांची किंमत 13 कोटी रुपयांच्या घरात आहे. तसेच फ्रान्समध्येही बच्चन दाम्पत्याची संपत्ती असून याशिवाय नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदनगर आणि गांधीनगर या शहरांमध्येही त्यांनी मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे.
काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषणा केली होती. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आणि अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांच्यासाठी तिकीट कापल्यामुळे नरेश अग्रवाल नाराज होते. त्यांनी सोमवारीच जया बच्चन यांच्यावर आक्षेपार्ह टीका करत भाजपामध्ये प्रवेश केला होता.