जया बच्चन यांची संपत्ती १ हजार कोटी, सहा वर्षांत झाली १00 टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:52 AM2018-03-14T04:52:39+5:302018-03-14T04:52:39+5:30
हिंदी अभिनेत्री व समाजवादी पार्टीच्या जया बच्चन या राज्यसभेतील सर्वात श्रीमंत सदस्य ठरू शकतील. त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, त्यात त्यांनी आपली संपत्ती तब्बल १ हजार कोटी रुपये इतकी दाखविली आहे.
नवी दिल्ली : हिंदी अभिनेत्री व समाजवादी पार्टीच्या जया बच्चन या राज्यसभेतील सर्वात श्रीमंत सदस्य ठरू शकतील. त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, त्यात त्यांनी आपली संपत्ती तब्बल १ हजार कोटी रुपये इतकी दाखविली आहे.
जया बच्चन यांनी चौथ्यांदा राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. भाजपाचे राज्यसभा सदस्य रवींद्र किशोर सिन्हा यांनी २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ८०० कोटी दाखविली होती. जया बच्चन यांची संपत्ती त्याहून अधिक आहे. त्यांनी २0१२ मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज केला, तेव्हा प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्ती ४९३ कोटी रुपये दाखविली होती. म्हणजेच ६ वर्षांत त्यांच्या संपत्तीत १00 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
जया बच्चन यांनी २0१२ मध्ये स्वत:कडे १५२ कोटी रुपये स्थावर, तर २४३ कोटी रुपये जंगम मालमत्ता असल्याचे म्हटले होते. यंदाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी अमिताभ बच्चन यांची स्थावर मालमत्ता ४६0 कोटी रुपये, तर जंगम मालमत्ता ५४0 कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, बच्चन दाम्पत्याकडे ६२ कोटी रुपये सोने व दागिने आहेत. त्यापैकी अमिताभ यांच्या नावे ३६ कोटींचे तर जया बच्चन यांच्या नावे २६ कोटींचे आहेत.
>१३ कोटींच्या कार
या दाम्पत्याकडे १२ कार आहेत. त्यांची किंमत आहे १३ कोटी. म्हणजे त्यांच्याकडील सर्व कार महागड्या व परदेशी बनावटीच्या आहेत.
शिवाय अमिताभ
यांच्याकडे एक टाटा नॅनो कार, तसेच एक ट्रक्टरही आहे.
अमिताभ यांच्याकडील घड्याळांची किंमत ३ कोटी ४0 लाख रुपये असून,
जया बच्चन यांच्याकडील घड्याळे ५१ लाख रुपये किमतीची आहेत.