94 कोटींचे दागिने, खात्यात 130 कोटी अन्...; एवढ्या कोटींचे मालक आहेत अमिताभ-जया बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:01 PM2024-02-14T16:01:44+5:302024-02-14T16:03:08+5:30
जया बच्चन यांना 'सपा'ने पाचव्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली.
Jaya Bachchan wealth : बॉलिवूड अभिनेत्री आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) पाचव्यांदा राज्यसभेवर (RajyaSabha Election) जात आहेत. त्यांना यापूर्वी चारवेळी समाजवादी पक्षाने (SP) राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आता पुन्हा एकदा त्या सपाकडून राज्यसभेत जात आहेत. त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती दिली.
जया बच्चन यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती
जया बच्चन यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली. त्यानुसार, 75 वर्षीय जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण 1578 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. यामध्ये 2022-23 या आर्थिक वर्षातील दोघांची कमाई नमूद करण्यात आली आहे. या कालावधीत जया बच्चन यांची कमाई 1,63,56,190 रुपये होती, तर अमिताभ बच्चन यांची रु. 273,74,96,590 होती.
बँक खात्यात कोट्यावधी, विमा पॉलिसी नाही
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, जया बच्चन यांच्याकडे 57,507 रुपये रोख आणि 10,11,33,172 रुपये बँक खात्यात जमा आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे 12,75,446 रुपये रोख आणि 120,45,62,083 रुपये बँक ठेव आहे. जया बच्चन यांनी केलेल्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे तर त्यांनी शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचरमध्ये 5,18,57,928 रुपये गुंतवले आहेत, तर अमिताभ बच्चन यांची यामध्ये 182,42,29,464 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. बच्चन दाम्पत्याने एनएसएस, पोस्टल सेव्हिंग किंवा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकही पैसा गुंतवला नाही.
40 कोटींहून अधिक किमतीचे दागिने
जया बच्चन यांच्याकडे 9 लाख रुपयांची वाहने आहेत, तर अमिताभ यांच्या कारचे कलेक्शन सुमारे 17 कोटी रुपये आहे. ज्वेलरीबद्दल बोलायचे झाले तर जया बच्चन यांच्याकडे 40 कोटी रुपयांचे दागिने आहेत, तर अमिताभ यांच्या नावावर 54 कोटींचे दागिने आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, एकूण संपत्तीपैकी या जोडप्याकडे 849.11 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 729.77 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.