जया बच्चन यांना यूपीतून सपाने दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 02:13 PM2018-03-07T14:13:55+5:302018-03-07T14:31:38+5:30
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातून अभिनेत्री जया बच्चन यांच्या नावाची राज्यसभा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
नवी दिल्ली- समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातून अभिनेत्री जया बच्चन यांच्या नावाची राज्यसभा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. त्यामुळे चौथ्यांदा राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यूपीमधील सपा आमदारांची संख्या पाहता जया बच्चन यांचं पुन्हा राज्यसभेत जाणं निश्चित मानलं जातं आहे. उत्तर प्रदेशात 23 मार्च रोजी राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होते आहे. समाजवादी पक्षाकडे सध्या 403 पैकी 47 आमदार आहेत. एका राज्यसभेच्या जागेसाठी 38 आमदारांची आवश्यकता आहे. संख्याबळ पाहता जया बच्चन यांचा विजय निश्चित मानाला जातो आहे. येत्या 3 एप्रिलला जया बच्चन यांच्या राज्यसभेतील खासदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. गेल्या तीन टर्म त्या समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या.
जया बच्चन यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने राज्यसभेचं तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी जोरदार लॉबिंग केली होती. मात्र अग्रवाल यांचा पत्ता कट करत पक्ष नेतृत्वाने जया बच्चन यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यापैकी 10 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 पैकी 312 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तर विधानसभेत झालेल्या पराभवामुळे समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन या समाजवादी पक्षाची साथ सोडून तृणमूल काँग्रेसच्या गोटात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात होती. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत जया बच्चन पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता होती. पण आता जया बच्चन यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.