कधीच गर्भवती नव्हत्या जयललिता, तामिळनाडू सरकारची न्यायालयात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 03:56 PM2018-07-25T15:56:41+5:302018-07-25T15:59:14+5:30
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता वैयक्तिक आयुष्यात कधीही गर्भवती नव्हत्या.
चेन्नई- गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता नावाच्या एका महिलेनं जयललितांची मुलगी असल्याचा दावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारनं मद्रास उच्च न्यायालयाला एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता वैयक्तिक आयुष्यात कधीही गर्भवती नव्हत्या. तसेच सरकारनं न्यायालयाला 1980च्या दशकातल्या काही व्हिडीओ क्लिपही दिल्या आहेत. तामिळनाडू सरकारचे वकील जनरल विजय नारायण यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
अमृता नावाची महिला एआयएडीएमके पार्टीच्या नेत्या राहिलेल्या जयललिता यांचा संपत्ती हडपण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच याचिकाकर्त्या महिलेकडे जयललितांबरोबरचा कोणताही फोटो नाही. व्हिडीओ क्लिप सोपवताना अमृताचा जन्म ऑगस्ट 1980मध्ये झाल्याचा दावा करत आहे. परंतु तिचा जन्म क्लिपच्या एका महिन्यापूर्वी झाला होता, अशी माहिती विजय नारायण यांनी दिली आहे. तसेच जयललिता जीवनात कधीही गर्भवती नव्हत्या. गरज पडल्यास जयललिता यांच्या नातेवाईकांच्या डीएनएशी अमृताच्या डीएनएशी मॅच होतंय का ते तपासलं जाईल, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.
आता या प्रकरणावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. जयललिता जातीनं ब्राह्मण असल्यानं त्यांच्यावर पुन्हा अंतिम संस्कार करण्याची अमृताची इच्छा आहे. त्यामुळेच तिने दफन केलेलं पार्थिव पुन्हा बाहेर काढण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे जयललिता यांनी 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 5 डिसेंबर 2016मध्ये चेन्नईमध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव मरिना बीचवर दफन करण्यात आलं. राजकारणात येण्यापूर्वी त्या एक यशस्वी अभिनेत्री होत्या.