जयललितांच्या जयंती दिनी जाहीर करणार राजकीय भूमिका - दीपा जयकुमार
By admin | Published: January 17, 2017 11:28 AM2017-01-17T11:28:35+5:302017-01-17T12:16:36+5:30
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जयललितांची
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 17 - जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जयललितांची मैत्रिण शशिकला पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे सरसावल्या असतानाच आता त्यांच्यासमोर जयललितांची भाची दीपा जयकुमार यांच्या स्वरूपात आव्हान उभे राहिले आहे. जयललितांच्या चेहऱ्याशी मिऴती जुळती ठेवण असलेल्या दीपा सक्रीय राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाल्या असून, जयललिता यांच्या जयंती दिवशी आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे दीपा यांनी आज सांगितले.
दीपा जयकुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले, त्या म्हणाल्या. "जयललितांच्या स्थानी मी अन्य कुणालाही पाहू शकत नाही, सध्या माझ्याकडे दोन पर्याय आहेत, त्यापैकी एक म्हणजे एआयएडीएमकेत सहभागी होणे आणि दुसरा म्हणजे सरळ नव्या पक्षाची स्थापना करणे. मात्र यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या समर्थकांशी चर्चा करणार आहे."
सध्या नेतृत्वहीन असलेल्या अण्णा द्रमुक पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक दावेदार उत्सुक आहेत, पण एका व्यक्तिच्या नेतृत्वावर पक्षात एकमत होत नसल्याने हा पक्ष फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या शशिकला नटराजन पक्षाचे नेतृत्व सांभाळत असल्यातरी दीपा यांच्या सक्रिय होण्यामुळे पक्षात नेतृत्वावरून लढाईला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
42 वर्षीय दीपा यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तामिळनाडूत लागत असलेल्या त्यांच्या पोस्टरमध्ये त्यांच्या चेहऱ्याची ठेवण जयललितांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता ठेवण्याची काळजी घेतली जात आहे. तसेच चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित त्या जयललिता यांच्यासारख्याच साड्या परिधान करत आहेत.
जयललितांच्या भावाची मुलगी असलेल्या दीपा यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले असून, जयललिता यांच्यावर उपचार सुरू असताना आपल्याला जयललिता यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप केल्यावर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. तसेच जयललितांच्या अंत्ययात्रेतही आपल्याला जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला होता.