जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी होणार
By Admin | Published: February 9, 2017 02:04 AM2017-02-09T02:04:02+5:302017-02-09T02:04:02+5:30
तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची शिफारस मी करणार असल्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी जाहीर केले
चेन्नई : तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची शिफारस मी करणार असल्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी जाहीर केले. जयललितांच्या मृत्युबद्दल अण्णाद्रमुकचे नेते व माजी विधानसभाध्यक्ष पी. एच. पांडियन यांनी काही आरोप केलेले आहेत. जयललितांच्या मृत्युबद्दल लोकांमध्ये संशयाचे वातावरण असून, ते दूर करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे पनीरसेल्वम म्हणाले.
दुसरीकडे आपणास राजीनामा द्यायला भाग पाडले गेले या पनीरसेल्वम यांनी केलेल्या आरोपाची केंद्रीय गुप्तचर खात्याकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी केली आहे. शशिकला यांना ‘शॉर्टकट’ वापरून मुख्यमंत्री बनता न आल्याने त्या द्रमुकवर खोटे आरोप करीत आहेत, असे ते म्हणाले. अण्णा द्रमुकमधील संघर्ष व मतभेद यांच्याशी आमचा संबंध नसल्याचे सांगून ते म्हणाले की, आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा शशिकला यांनी पनीरसेल्वम यांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्यावे. (वृत्तसंस्था)
पनीरसेल्वम यांच्या ताज्या वक्तव्याचे राज्यसभेत बुधवारी पडसाद उमटले. परंतु तो मुद्दा उपस्थित करण्यास परवानगी दिली गेली नाही. सभागृहाचे कामकाज सुरू होताच डी. राजा (भाकप) म्हणाले की, तामिळनाडूवर राजकीय पेचप्रसंगाची दाट छाया पडली आहे.
राजा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे तामिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार आहे, असे म्हणताच, उपसभापती पी.जे. कुरियन यांनी त्यांना अडवले आणि तामिळनाडूचे लोक परिस्थितीची योग्य ती काळजी घेतील, असे नमूद केले. तामिळनाडूचे लोक निर्णय घेण्यास सक्षम आहेत.
आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे म्हणून कुरियन यांनी इतर कोणत्याही सदस्याला हा मुद्दा उपस्थित करण्यास परवानगी दिली नाही.