बिहार निवडणुकीत जदयू रालोआसोबतच; नितीशकुमार यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:35 AM2020-03-02T06:35:27+5:302020-03-02T06:35:58+5:30
बिहार विधानसभेची आगामी निवडणूक जदयू ‘रालोआ’सोबतच लढवील आणि २०० जागा नक्की जिंकेल
पाटणा : बिहार विधानसभेची आगामी निवडणूक जदयू ‘रालोआ’सोबतच लढवील आणि २०० जागा नक्की जिंकेल, असा विश्वास जदयूचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी येथे व्यक्त केला.
येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या सभेत कुमार बोलत होते. ही सभा म्हणजे नितीशकुमार यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त केलेले शक्तिप्रदर्शन होते. ‘२०२० : फिनिश नितीश’ या राजदच्या घोषवाक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या सभेत ‘२०२० : फिरसे नितीश’ अशी प्रतिघोषणा देण्यात आली. राजद व काँग्रेसवर सडकून टीका करताना नितीशकुमार म्हणाले की, या पक्षांना अल्पसंख्य समाजाच्या फक्त मतांमध्ये स्वारस्य आहे. जदयू मात्र या समाजांच्या प्रगतीसाठी झटत असतो.
आता राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण देशात सर्वात कमी आहे, असा दावाही त्यांनी केला. भागलपूर दंगलीतील गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखवून जदयूने दंगलग्रस्तांना न्याय देण्याचेही काम केले, असे ते म्हणाले.