जदयु-राजद आघाडीत सुंदोपसुंदी
By admin | Published: September 17, 2016 03:09 AM2016-09-17T03:09:04+5:302016-09-17T03:09:04+5:30
लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू
एस. पी. सिन्हा, पाटणा
लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, यामागचे कारण शहाबुद्दीनला जामीन मिळणे, एवढेच नाही, तर इतरही कारणे आहेत.
शहाबुद्दीनला जामीन मिळाल्यानंतर जदयू-राजद सरकारमधील नेते परस्परविरोधी विधाने करीत आहेत. सूत्रांनुसार सध्या तरी जदयु-राजद आघाडीची स्थिती चिंताजनक बनली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजदच्या काही नेत्यांच्या विशेषत: रघुवंश प्रसाद सिंह यांच्या वक्तव्याने नाराज आहेत. जदयु-राजद आघाडी निवडणूक जिंकल्यापासून रघुवंश प्रसाद हे नितीश यांच्यासाठी डोकेदुखी बनले आहेत. अलीकडेच, जदयुच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, रघुवंश यांनी मर्यादेत राहावे किंवा राजदने त्यांची हकालपट्टी करावी.
शहाबुद्दिनविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात
शहाबुद्दिनची जामिनावर सुटका करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अपिल केले आहे. श्हाबुद्दिनचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी बिहार सरकारने न्यायालयात स्वत:हून केली आहे. त्याचे सत्ताधारी आघाडीवर लगेच कोणतेही परिणाम झाले नसले तरी त्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.