जदयू फुटीकडे, शरद यादव नाराज, वीरेंद्र सिंग यांचा केरळमध्ये वेगळा पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:00 AM2017-08-12T02:00:00+5:302017-08-12T02:00:27+5:30
महाआघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीच्या मदतीने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय पक्षामध्ये सहमतीने झाला होता. ज्यांना तो पटलेला नाही, ते आपला स्वत:चा निर्णय घेण्यास मोकळे आहेत, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी शुक्रवारी अप्रत्यक्षपणे संयुक्त जनता दलातून बाहेर पडण्याचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद यादव आणि त्यांच्या समर्थकांना दिला.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : महाआघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीच्या मदतीने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय पक्षामध्ये सहमतीने झाला होता. ज्यांना तो पटलेला नाही, ते आपला स्वत:चा निर्णय घेण्यास मोकळे आहेत, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी शुक्रवारी अप्रत्यक्षपणे संयुक्त जनता दलातून बाहेर पडण्याचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद यादव आणि त्यांच्या समर्थकांना दिला.
त्यामुळे पक्षात फूट अटळ आहे. पक्षाचे केरळमधील राज्यसभा सदस्य वीरेंद्र कुमार यांनी यापूर्वीच नितीश यांचा निर्णय आपणास मान्य नसून, आपण केरळमध्ये प्रादेशिक पक्ष स्थापन करून तेथील काँग्रेस प्रणीत युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटमध्ये सहभागी होणार आहोत, असे जाहीर केले आहे.
दुसरीकडे शरद यादव काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते नितीश कुमार यांच्याशी समझोता करण्याची चिन्हे नसल्याने ते बिहारमध्ये वेगळा पक्ष स्थापन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीश कुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि बिहारच्या विकासासाठी केंद्राने निधी द्यावा, अशी विनंती त्यांना केली. त्यानंतर दुपारी ते भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही भेटले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित होते.
शरद यादव यांनी गुरुवारीच नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. महाआघाडीतून बाहेर पडून भाजपासमवेत सरकार बनवणे, ही बिहारमधील ११ कोटी जनतेशी गद्दारी आहे, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी यादव यांना तुमचा निर्णय घेण्यास तुम्ही मोकळे आहात, असे
सुनावले. यादव हे संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे सदस्यही आहेत.
अली अन्वर निलंबित
विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतल्याप्रकरणी जेडीयूचे नेते अली अन्वर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.