जेडीएस लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, माजी पंतप्रधान देवेगौडा यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 03:51 PM2023-07-25T15:51:08+5:302023-07-25T15:51:48+5:30
देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) गेल्या आठवड्यात दिल्लीत ३८ घटक पक्षांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले होते. तर दुसरीककडे आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांकडून एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे.
दरम्यान, जनता दल (सेक्युलर)चे अध्यक्ष आणि देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. जेडीएस लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे एचडी देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच, जेडीएस भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया'शी युती करणार नाही, असे यावरून दिसून येते.
"आम्ही चार जागा जिंकू किंवा पाच किंवा सहा, पण आम्ही एकटेच लढू", असे एचडी देवेगौडा म्हणाले. तसेच, "जेडीएस आगामी लोकसभा निवडणुकीसाठी फक्त त्या भागातच उमेदवार उभे करेल, जिथे पक्ष मजबूत आहे. याबाबत कार्यकर्त्यांशीही चर्चा केली जाईल", असेही एचडी देवेगौडा यांनी सांगितले. दरम्यान, २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कर्नाटकात भाजप आणि जेडीएस यांच्यात युती होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, एचडी देवेगौडा यांच्या विधानानंतर भाजपसोबत जेडीएस जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
#WATCH | Bengaluru: On alleged alliance between JDS and BJP in Karnataka, JDS chief HD Devegowda says, "Let me be very clear. There is no question of aligning with anybody, we will fight the battle independently on our own." pic.twitter.com/ok1lxJivzl
— ANI (@ANI) July 25, 2023
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि विरोधी पक्ष रणनीती आखत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या हॅट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह विरोधी पक्षातील नेते बैठका घेत आहेत. गेल्याच आठवड्यात २६ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही बंगळुरू येथे आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला कसे पराभूत करावयाचे, यावर विचारमंथन केले. तसेच, या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' (इंडिया) असे नाव दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार, हे स्पष्ट झाले आहे.